पोट भाजपचं दुखतंय पण बाळंतकळा राज्यपालांना; शिवसेनेचा राज्यपालांवर टीकेचा बाण

shivsena slams maharashtra governor bhagat singh koshyari on temple reopen

राज्यातील मंदिरं खुली करण्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांच्या हिंदुत्वावरून सवाल केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सेक्युलॅरिझम स्वीकारलात का? अशी विचारणा केली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहीत खरमरीत उत्तर दिलं. दरम्यान, आता राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रावरुन राज्याल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातील भाषेवरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्यपालांवर टीकेचे बाण सोडले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राजभवनाची रोज अप्रतिष्ठाच सुरू असून राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पाठवलेलं पत्र हा तर अगोचरपणाच म्हणायला हवा. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘एकच’ मारला, पण सॉलीड मारला! हे शिवतेज पाहून मंदिरांतील देवांनीही आनंदाने घंटानाद केला असेल. हा घंटानाद पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांपर्यंत पोहोचलाच असेल, तर ते राजभवनाची प्रतिष्ठा राखण्यासाठी राज्यपालांना माघारी बोलवतील, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसे वागू नये ते भगतसिंग कोश्यारी यांनी दाखवून दिले आहे. श्रीमान कोश्यारी हे कधीकाळी संघाचे प्रचारक किंवा भाजपचे नेते असतीलही; पण आज ते महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याचे राज्यपाल आहेत याचा त्यांना सोयीस्कररीत्या विसर पडलेला दिसतोय. महाराष्ट्रातील भाजप नेते रोज सकाळीच सरकारच्या बदनामीची मोहीम सुरू करतात हे समजण्यासारखे आहे; पण त्या मोहिमेचा चिखल राज्यपालांनी आपल्या अंगावर का उडवून घ्यावा? भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्ता गमावली ही वेदना मोठी आहे; पण त्यांच्या दुखणाऱ्या पोटावर राज्यपालांनी सारखा लेप लावण्यात अर्थ नाही. हे दुखणं किमान पुढची चार वर्षे राहणारच आहे. पण भाजपचे पोट दुखतेय म्हणून घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात हे जरा गंभीर आहे,” असं म्हणत शिवसेनेने टीकेचे बाण सोडले आहेत. राज्यपालांच्या बाळंतकळांवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपचार केले असून राज्यपाल पदावरील बुजुर्ग व्यक्तीने आपल्या मर्यादा सोडून वागले तर काय होते, त्याचा धडा देशातील सर्वच राज्यपालांनी घेतला असेल, असा टोला देखील लगावला आहे.

“राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले. ते पत्र मुख्यमंत्र्यांच्या हाती पोहोचण्याच्या प्रवासातच वृत्तपत्रांकडे पोहोचले. राज्यात बार, रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. मग प्रार्थना स्थळे बंद का? मंदिरे बंद ठेवण्याचे दैवी संकेत आपणास मिळत आहेत का? की तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात? असा सवाल राज्यपालांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या धोतरालाच हात घातला व राजभवन गदागदा हलवले अशी भाषा आम्ही वापरणे असंसदीय ठरेल; पण मुख्यमंत्र्यांनी खास ठाकरी शैलीत राज्यपालांना खरमरीत उत्तर दिले आहे खरे. ठाकरे यांनी कडक शब्दांत सांगितले की, ‘राज्यपाल महोदय, घटनेनुसार तुम्ही राज्यपाल पदाची शपथ घेतली. तुम्हाला देशाची घटना, सेक्युलॅरिझम मान्य नाही काय? आणि तुम्हाला आमच्या हिंदुत्वाची उठाठेव करण्याची गरज नाही. माझ्या हिंदुत्ववादाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही.’ अशा पद्धतीने मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक लोहारकी देत महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, बाणेदारपणा काय असतो ते दाखवून दिले. राज्यपालांनी या प्रकरणात आ बैल मुझे मार असेच वर्तन केले. पण इथे बैल नसून ‘वाघ’ आहे हे ते कसे विसरले?” असं शिवसेनेने अग्रलेखातून म्हटलं आहे.

“सर्व ‘धुलाई’ प्रकरणात भारतीय जनता पक्षाचेही वस्त्रहरण झाले. राज्यपालांचा वापर करून महाराष्ट्र सरकारवर हल्ले करणे त्यांना महागात पडले. हे सर्व प्रकरण आपल्यावरच अशा पद्धतीने उलटवले जाईल व तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागेल याची कल्पनाही त्यांनी केली नसेल. या प्रकरणात भाजप व त्यांनी नेमलेले राज्यपाल इतके उघडे पडले आहेत की श्रीकृष्णाने वस्त्र पुरविली तरी त्यांची अब्रू वाचणार नाही. महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम आहे असे चार तासांपूर्वीच पंतप्रधान मोदी सांगतात व त्यांच्या मार्गदर्शनाची पर्वा न करता भाजपवाले व त्यांचे राज्यपाल मंदिरे उघडा, गर्दी झाली तरी हरकत नाही, असा घोषा लावतात हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“राज्यपाल भगतसिंग हे सध्या गोव्याचेही राज्यपाल आहेत. गोवा ही खऱया अर्थाने देवभूमीच आहे. मंगेशी, महालक्ष्मी, महालसा अशी सर्व देवस्थाने गोव्यात आहेत. गोव्याचे राजकारण, अर्थकारण मंदिरे व इतर प्रार्थना स्थळांवरच सुरू असते. गोव्यातही रेस्टॉरंटस् चालू आणि मंदिरे तशी कुलूपबंदच आहेत. मग मंदिरे उघडण्यावरून महाराष्ट्र सरकारला विचारणा करणारे राज्यपाल कोश्यारी गोव्यातील भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना तोच सवाल का करीत नाहीत? हे असले सवाल-जवाब फक्त महाराष्ट्रातच सुरू आहेत. कारण येथे भाजपचे मुख्यमंत्री नाहीत. राज्यपालांची नियत साफ असती तर त्यांनी गोवा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एकाच वेळी पत्र लिहून चिंता व्यक्त केली असती,” असा घणाघात करण्याता आला आहे.