धक्कादायक, रिपोर्ट येण्यापूर्वीच रुग्णाची आत्महत्या

जामनेर कोविड सेंटरमधील घटना, प्रबोधनानंतरही कोरोनाची दहशत कायम

corona positive sucide

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरीही बरे होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. असे असतानाही कोरोनाची दहशत मात्र कमी झालेली नाही. त्यामुळेच जळगाव जिल्ह्याच्या जामनेर येथील कोविड सेंटरमध्ये एका रुग्णाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे.

जळगाव जिल्हयाच्या जामनेर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये ही दुर्घटना घडली. कडुबा नकुल घोंगडे (वय ५०, रा. पहूर ता. जामनेर) असे आत्महत्या करणार्‍या रुग्णाचे नाव आहे. येथील वॉर्ड ६ मध्ये घोंगडे यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची अँटिजेन चाचणी करण्यात आली होती. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तरीदेखील त्रास कमी होत नसल्याने त्यांना करोनाच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी जळगाव येथील कोविड रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथून ९ सप्टेंबरला त्यांना पहुरच्या ग्रामीण रुग्णालयातून जळगाव येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्रास कमी होत नसल्याने गुरूवारी पुन्हा त्यांचा स्वॅब घेण्यात आला. मात्र त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तत्पूर्वीच त्यांनी गुरूवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

उपचारानंतरही वैफल्य

उपचार घेऊनही बरे वाटत नसल्याने कडूबा घोंगडे यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर रूग्णालयातील वॉर्ड ६ मध्ये उपचार सुरू होते. रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी रात्री त्यांनी जेवण घेतले नव्हते. त्यांना वारंवार विनंती करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. रात्री उशिरापर्यंत त्यांना झोप येत नसल्याचे लक्षात येताच राउंडवर आलेल्या नर्सने त्यांना झोपण्याची विनंती केली. नर्स पुन्हा रात्री साडेबारा वाजता राऊंडवर आल्या असताना कडुबा बेडवर नव्हते. त्यांचा शोध घेतला असता वॉर्ड सहाच्या बाजूच्या खोलीत कडुबा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.