घरताज्या घडामोडीदुकानदारांनी एका वेळी दोन ग्राहकांना प्रवेश द्यावा; पोलीस निरीक्षक घुटुकडेंचं आवाहन

दुकानदारांनी एका वेळी दोन ग्राहकांना प्रवेश द्यावा; पोलीस निरीक्षक घुटुकडेंचं आवाहन

Subscribe

शहरात संचारबंदी असतानाही अनेक नागरिक विनाकारण फिरताना दिसून येत आहेत.

करोनासारख्या भयावह विषाणूमुळे संपूर्ण जग हादरले असून, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात त्याची लागण व्हायला सुरुवात झाली आहे. जीवनावश्यक वस्तू विकण्यासाठी किराणा, दूध, तसेच औषधांच्या दुकानांना आपले व्यवसाय चालू ठेवण्याची शासनाने परवानगी दिली आहे. मात्र या दुकानांमध्ये नियमापेक्षा अनेक ग्राहक दिसत असल्याचे आढळून येत असून, दुकानदारांनी एकावेळी दोन ते चारच ग्राहकांना आपल्या दुकानात घ्यावे, असे आवाहन येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी व्यापार्‍यांना केले आहे.

याबाबत ‘आपलं महानगर’शी बोलताना घुटुकडे म्हणाले की, शहरात संचारबंदी असतानाही अनेक नागरिक विनाकारण फिरताना दिसून येत आहेत. या मंडळींना पोलिसी खाक्या दाखविण्यास प्रारंभ केला असून, वेळप्रसंगी त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरात चोवीस तास पोलिसांचे पेट्रोलिंग चालू करण्यात आले आहे आणि राष्ट्रीय महामार्ग, तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज

दरम्यान, नोकरीनिमित्त परदेशात असलेले दोन नागरिक शहरात आले आहेत. यातील एक व्यक्ती ५ मार्च रोजी आखातातून, तर दुसरा चार दिवसांपूर्वी पूर्व आफ्रिकेतून आला आहे. शासनाच्या आदेशानुसार या दोन्ही व्यक्तींना मंगळवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाचारण करून त्यांची तपासणी केली आहे. त्यांच्यात कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आली नसल्याने त्यांच्या हातावर शिक्के मारून होम क्वारंटाईन म्हणून त्यांची रवानगी त्यांच्या घरी केली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी सांगितले. आरोग्य केंद्रात सर्दी, तापाचे ७० ते ८० रुग्ण नियमित येत आहेत. सध्या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असल्याने अपघातांना आळा बसला आहे. मात्र प्रसुतीसाठी महिला रोज येत असून, त्यांना सहकार्य केले जात आहे. खेडेगावातील गर्भवती महिलेला येथे येण्यासाठी वेळीच वाहन मिळत नसल्याचे निदर्शनात येत आहे. या महिलांना प्रसुतीच्या कळा चालू झाल्यास त्या महिलेच्या कुटुंबियांनी १०२ क्रमांकावर संपर्क साधल्यास रुग्णवाहिका तातडीने त्या ठिकाणी जाऊन महिलेला आरोग्य केंद्रात आणू शकेल. याबाबत विभागातील सर्व गावांमध्ये तसे आवाहन सुद्धा करण्यात आले असल्याची माहिती डॉ. म्हात्रे यांनी दिली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -