घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकचे भाजपचे सहा नगरसेवक नॉट रिचेबल

नाशिकचे भाजपचे सहा नगरसेवक नॉट रिचेबल

Subscribe

या नगरसेवकांशी संपर्क सुरू असून हे सर्व नगरसेवक पंचवटी प्रभागातील असून सानप समर्थक मानले जातात. तर शिवसेनेचे नगरसेवकही सहलीला रवाना झाले आहेत.

राज्यात सत्ता समीकरणे बदलण्याची चिन्हे असल्याने महापालिका निवडणुकीत त्याचे पडसाद उमटू नये याकरीता भाजपने विशेष सर्तकता बाळगत फोडाफोडीच्या धास्तीने आज आपले सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केले. मात्र सहा नगरसेवकांशी संपर्क होउ न शकल्याने भाजपचे धाबे दणाणले आहेत. या नगरसेवकांशी संपर्क सुरू असून हे सर्व नगरसेवक पंचवटी प्रभागातील असून सानप समर्थक मानले जातात. तर शिवसेनेचे नगरसेवकही सहलीला रवाना झाले आहेत.

नाशिक महापौरपदाची निवडणूक येत्या २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. महापालिकेत ६५ नगरसेवक असल्याने भाजप बहुमतात आहे. मात्र राज्यात शिवसेना आणि भाजप युती तुटल्यानंतर नाशिक महापालिकेतही सत्तांतर करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी पुरेसे संख्याबळ भाजपकडे दिसत असले तरीही राज्यात होत असलेली महाशिवआघाडीचा परिणाम महापालिका निवडणुकीतही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने स्थानिक स्तरावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिकेत एकूण १२२ नगरसेवक आहेत. पैकी भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाने राजीनामा दिल्याने भाजपचे सध्या ६५ तर शिवसेनेचे ३४ नगरसेवक आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रत्येकी ६, मनसेचे ५, अपक्ष ३ आणि आरपीआय आठवले गटाचा एक नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. सध्या शिवसेनेकडे विरोधीपक्षनेतेपद आहे. पूर्वी भाजपमध्ये असलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादीमार्गे शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सानप यांनी १४ ते १५ नगरसेवक निवडून आणले होते. त्यामुळे सानप समर्थक नगरसेवकांच्या जोरावर महापौरपद मिळविण्याची रणनिती शिवसेनेकडून आखली जात आहे. त्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे भाजपच्या आणि माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

भाजपला ही निवडणूक आव्हानात्मक

त्यामुळे नगरसेकांची फाटाफूट होवू नये याकरीता भाजपने विशेष सतर्कता बाळगत आज आपले सर्व नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना केले. याकरीता आज सकाळपासूनच सर्व आमदारांना महापौरांच्या रामायण या निवासस्थानी एकत्रित होण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र दुपारनंतर हे ठिकाण बदलण्यात येवून याबाबत गुप्तता पाळण्यात आली. शहरातील तीनही आमदारांवर आपापल्या मतदारसंघातील नगरसेवकांना आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार आमदारांनी फोनाफोनी करून सर्व नगरसेवकांना एकत्रित केले. भाजपचे ६५ नगरसेवक असून त्यापैकी ४८ नगरसेवक सहलीसाठी रवाना झाले आहेत. तर महापौर, उपमहापौर, गटनेते नाशिकमध्ये असून सहा नगरसेवक मात्र नॉटरिचेबल असल्याने भाजपचे धाबे दणाणले आहेत. जे नगरसेवक अनुपस्थित होते ते पक्षाने उमेदवारी नाकारलेले आणि सध्या शिवसेनेत असलेले माजी आमदार सानप यांच्या संपर्कात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपलादेखील ही निवडणूक आव्हानात्मक मानली जात आहे.

- Advertisement -

नगरसेवकांची अनुपस्थिती सत्तांतर घडवणार?

या अनुपस्थित नगरसेवकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र कोणताही संपर्क होऊ शकला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेचे ३४, काँग्रेस, राष्ट्रवादीचे एकूण १२, मनसे ५, अपक्ष ३, आणि रिपाई आठवले गटाचा १ असे सर्व एकत्र झाल्यास ५५ अशी संख्या होते. त्यामुळे सहा नगरसेवक फुटल्यास किंवा अनुपस्थित राहिल्यास सत्तांतर होवू शकते.

महाजन सांभाळणार सूत्रं

राज्यात सर्वाधिक जागा येवूनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. मित्रपक्ष शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समान वाटा मागितल्याने सध्या भाजप सत्तेपासून दूर आहे. शिवसेना आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता असल्याने याचा फटका महापौर निवडणुकीत भाजपला बसू शकतो. नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता येण्यात बाळासाहेब सानप यांचा मोलाचा वाटा होता. मात्र सानप शिवसेनेत गेल्याने त्यांच्या माध्यमातून सेनेने महापौरपद मिळविण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. त्यामुळे आता माजी पालकमंत्री गिरीश महाजन हे रविवारी तातडीने नाशिकमध्ये दाखल होत असून पुढील सुत्रे महाजन स्वतः सांभाळणार आहेत.

शिवसेनेचीही मोर्चेबांधणी

भाजप पाठोपाठ आज शिवसेनेनेही आपल्या नगरसेवकांची बैठक घेवून महापौरपदाच्या रणनितीबाबत चर्चा केली. महाआघाडीच्या मदतीने नाशिक महापालिकेवरही सेनेचा भगवा फडकेल असा विश्वास शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा सुरू आहे. तसेच इतर पक्षांचेही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले. याबाबत लवकरच मुंबईत बैठक घेण्यात येऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -