पुणे-बंगळुरू महामार्गावर बस-ट्रकच्या भीषण अपघात; ६ ठार; २० जखमी

या घटनेतील मृत आणि जखमी प्रवाशी कर्नाटकातील असल्याचा अंदाज

satara
accident
अपघात

पुणे-बंगळुरु महामार्गावर साताऱ्यात डी-मार्टसमोर ट्रक आणि ट्रॅव्हल बसच्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असूम हा अपघात सातारा शहराजवळ असलेल्या खंडेवाडी येथे सकाळी झाला. या अपघातातील मृत पावलेले प्रवासी तसेच गंभीर जखमी झालेले प्रवासी कर्नाटकात राहणारे आहेत, असे समजते.

असा झाला अपघात

पुणे-बंगळुरू महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने हा मालवाहतूक करणारा ट्रक जात होता. या ट्रकमागेच ट्रॅव्हल बसही जात होती. दरम्यान, सातारा शहरा जवळ असलेल्या खंडेवाडीजवळील उतारावर अचानक ट्रकचे टायर फुटले. टायर फुटल्यामुळे चालकाने ट्रक जागीच थांबवला. यावेळी भरधाव असलेली ट्रॅव्हल बस पाठीमागून ट्रकवर जोरात आदळल्याने हा भीषण अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून जखमींना जवळच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.

या भीषण अपघातात सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर २० प्रवासी जखमी झाले असून घटनेतील मृत आणि जखमी प्रवाशी कर्नाटकातील असल्याचा अंदाज आहे.