Lockdown Crisis : राज्यात सोळा नाभिक व्यावसायिकांची आत्महत्या

शेतकऱ्यांप्रमाणे पिडीत नाभिक कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची संघटनेची राज्यसरकारकडे मागणी

suicide

संपूर्ण जगासह देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोविड-१९ विषाणूची लागण झाल्याने अनेक नागरिकांना आपले हकनाक प्राण गमवावे लागत आहेत. या जीवघेण्या कोरोनाची लस अद्यापही जगात कोठेच विकसित झालेली नाही. त्यामुळे नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी सरकारकडे सोशल डिस्टंसिंगशिवाय पर्याय उपलब्ध नसल्याने गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन तर काही ठिकाणी अनलॉकचे नियम लागू करावे लागत आहेत. त्यामुळे पाच महिन्यांपासून केश कर्तनालयाची दुकाने देखील बंद ठेवणे भाग पडले होते. त्यामुळे या नाभिक व्यवसायीकांसमोर कुटुंबाचे पालन पोषण करण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने कौटुंबिक विवंचनेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील १६ नाभिक व्यावसायिकांनी कोणी विषारी औषध तर काहींनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवून आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आले आहेत. या आत्महत्यांमध्ये नवनाथ साळुंखे (३५), रा.इरळी, ता.कवठेमहाकाळ,जि. सांगली, दीपक तुळशीराम महोकार (४३) रा.शनवारा, ता.आकोट, जि. अकोला, स्वप्निल चौधरी(३०) रा.दुर्गापूर, जि. चंद्रपूर, रामदास कडूकर(५८) ता. मोरगाव, जि. यवतमाळ, शांताराम श्रावण शिरसाठ (४२) रा.शिरपूर, जि. धुळे, अशोक बानक (३५) रा.डबकी, ता. देवरी, जि. गोंदिया, सतिश मनोहर धानोरकर (३५) रा. तिवसा, जि. अमरावती, रामराव चांदूरकर (५५) रा. खानापूर, ता. मोर्शी, जि. अमरावती, दिलीप बाबुराव कापसे (५१) रा. यादवनगर, ता. पाचपावली, जि. नागपूर, बबन सूर्यवंशी (४५) रा. निमगाव, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया, केशव वसंता वाटकर, रा. दारोडा, ता. हिंगणघाट, जि. वर्धा, खंडू बाबूराव पंडीत, रा. हिवरा, ता. बुम, जि. अहमदनगर, शैलेश यशवंतराव लक्षने (४०) रा. बैलतरोडी (पिवळी), जि. नागपूर, मनोहर नास्नूरकर (५१) रा. पार्वती नगर, नागपूर, जि. नागपूर, चंद्रकांत कोंडीराम दळवी, रा. इस्थळ, ता. केज, जि. बिड, मयूर नरेश जाधव, रा. कांबे, ता. भिवंडी, जि.ठाणे आदींचा समावेश आहे.

या आत्महत्याग्रस्त पीडितांची राज्य सरकारने दखल घेतलेली नाही. कुटूंब चालकच जग सोडून गेलेले आहेत. त्यामुळे या कुटुंबांना राज्य शासनाने महिना १५ हजार रुपये प्रमाणे सहा महिन्यांसाठी आर्थिक मदत करून या आत्महत्याग्रस्त पीडीत नाभीकांच्या कुटुंबीयांना राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या धर्तीवर तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी राष्ट्रीय नाभिक संघटनेचे सरचिटणीस महेंद्र (मयुर ) जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तर याच प्रश्नासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारकडे आवाज उठवून आत्महत्याग्रस्त नाभिक कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय नाभिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण जाधव यांनी लेखी निवेदन देऊन केली आहे.