झोपेत असणार्‍या नवर्‍याला जिवंत जाळले

पत्नी रातोरात पुण्याला पसार

Mumbai

एक आठवड्यापूर्वी बदलापूर, पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खोलीला आग लागून त्यात एका इसमाचा जळालेला मृतदेह पोलिसांना सापडला. मात्र तपासात त्या इसमाची पत्नी आग लागल्याच्या ठिकाणाहून गायब झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास केला असता त्या इसमाच्या पत्नीनेच त्याला जाळून मारल्याची खळबळ जनक माहिती उजेडात आली. पोलिसांनी त्या महिलेविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केाला आहे.

नेव्हीमधून सेवानिवृत्त झालेले आणि दिल्ली येथील आयकर विभागात कामाला असलेले गुड्डूसिंग दरबारी यादव (४२) हे पत्नी सुनीता गुड्डूसिंग यादव (३८) हिच्यासोबत बदलापूर पश्चिमेकडील घरी सहा दिवसांपूर्वी राहायला आले होते. गुड्डुसिंग यांना आपली ती रूम विकायची असल्याने ते त्या ठिकाणी काही दिवसांसाठी राहण्यास आले होते.

साधारण आठवड्यापूर्वी रात्री दीडच्या सुमारास गुड्डूसिंग यांच्या घरातून धूर येवू लागल्याने परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस आणि अग्निशमन विभागाला दिली. त्यावेळी गुड्डूसिंग याच्या घरात त्यांचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना मिळून आला होता. चौकशीत गुड्डूसिंग यांच्यासोबत त्यांची पत्नी सुनीता ही देखील राहात होती हे उघड झाले. पण घटना घडल्यापासून ती त्या ठिकाणाहून पसार झाली होती.

सुनीता ही पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याची माहिती पुणे बंडगार्डन पोलिसांनी बदलापूर पोलिसांना दिली. पती गुड्डूसिंग याच्यासोबत झालेल्या भांडणात तो रात्री झोपेत असतानाच त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जाळले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह बेवारस स्थितीत त्याच घरात टाकून ती पळून गेली. पतीला जाळताना तिचा पाय देखील त्या आगीत भाजला होता. बदलापूरहून मध्यरात्री निघून ती थेट पुण्यातील ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. त्यावेळी बंड गार्डन पोलिसांंनी तिच्याकडे केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here