सोलापूर भाजप खासदारांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बनावट? याचिका दाखल

Jaysidheshwar Sushilkumar Shinde Prakash Ambedkar
भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत असा उल्लेख असून त्यांनी बेडा जंगम जातीचा बनावट दाखला तयार केला असल्याचा आरोप सोलापूरचे माजी महापौर आणि लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी केला आहे. या प्रकरणी गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण आता हायकोर्टात पोहोचले आहे.

२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले होते. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. तर भाजपने विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचे तिकीट कापून लिंगायत धर्मगुरु असलेले डॉ. जयसिद्धेश्वर यांना उमेदवारी दिली होती.

भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर तथा नुरदय्यास्वामी गुरुबसप्पा यांना हायकोर्टाने नोटीस बजावल्यानंतर सोलापूर जिल्हाधिकारी, अक्कलकोट तहसीलदार, जात पडताळणी समिती आणि निवडणूक आयोगाला देखील या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले आहे. तसेच २७ जानेवारी रोजी जात पडताळणी समितीच्या सुनावणीस हजर राहण्याबाबत सूचना केली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे निवडणुकीवेळीच अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गायकवाड यांची हरकत विचारात न घेता त्यांचा अर्ज वैध ठरविला होता.