घरमहाराष्ट्रउरणमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा

उरणमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा

Subscribe

मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास व नागरी विकास होत असलेल्या तालुक्यातील घनकचर्‍याचा प्रश्न गंभीर बनला असून अनेक गावांच्या वेशीवर, रस्त्यांच्या कडेला कचर्‍याचे ढिग दिसत आहेत. कधी काळी स्वच्छ आणि सुंदर असलेल्या या गावांना आता बकालपण आला आहे. घनकचरा व्यवस्थापनात सिडकोसह स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत समिती अपयशी ठरत असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.

उरण तालुक्यात घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी सिडकोने धुतुम, पागोटे, कुंडेगाव या गावांसाठी सेक्टर 2 मधील भूखंड क्रमांक 31, नवघरसह नवघरपा, भेंडखळसाठी सेक्टर 12 मधील गार्डन भूखंड, डोंगरीसह फुंडे, पाणजे या गावांसाठी सेक्टर 27 मधील 88 क्रमांकाचा भूखंड, सिडको वसाहतीसाठी सेक्टर 30 व सिडको वसाहत बोकडवीरासाठी सेक्टर 51 चा भूखंड, तर नागाव, म्हातवली, केगावसाठी सर्व्हे क्रमांक 121,122-2 हे भूखंड डम्पिंग ग्राऊंडसाठी आरक्षित म्हणून घोषित केले होते. या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याची सिडकोची योजना होती. ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या सहकार्याने हे प्रकल्प राबविण्यात येणार होते. या पाच प्रकल्पांसाठी प्रत्येकी 55 लाख रूपये खर्च करण्यात येणार होते. आता या भूखंडांवर एकतर अतिक्रमण किंवा खारफुटी उगवली असल्यामुळे ते भूखंड सिडकोला विकता येत नाहीत असेच भूखंड यासाठी आरक्षित केले आहेत.

- Advertisement -

अनेक ग्रामपंचायतीनी हे भूखंड आमच्या ताब्यात मिळावेत अशी मागणी करूनही सिडको हे भूखंड हस्तांतरित करण्यास तयार नाही. ग्रामपंचायतीना भूखंड दिल्यास ओएनजीसी या ग्रामपंचायतीना कचरा निर्मुलनासाठी सीएसआर फंडातून मदत करण्यास तयार आहे. मात्र ओएनजीसीने सिडकोकडे हा निधी हस्तांतरीत करावा, अशी अट सिडकोने घातल्याने ओएनजीसीने निधी देण्यास असमर्थता दाखविली आहे. त्यामुळे तालुक्यात घनकचरा निर्मूलन योजनेचा पार बोजवारा उडाला आहे.

सिडकोकडे हे भूखंड मागण्यासाठी अनेक वेळा बैठका घेण्यात आल्या, मात्र सिडकोकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. चाणजे, केगाव, नागाव, म्हातवली या मोठ्या प्रमाणात विकसित होत असलेल्या विभागांच्या कचर्‍याकरिता बोरी पाखाडी येथील सर्व्हे क्रमांक 85 हा 2 एकरचा सरकारी भूखंड निवडला आहे. तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तेथे कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
-कल्पना गोडे, तहसीलदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -