घरमहाराष्ट्रविरोधी पक्षात असलो की अधिक काम करता येतात

विरोधी पक्षात असलो की अधिक काम करता येतात

Subscribe

शरद पवार यांचा दलबदलू नेत्यांना टोला

“देशात लोकसभा निवडणूक होऊन गेल्या आहेत. आता तीन ते चार राज्यात निवडणुका आहेत. पण, महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी वेगळेच वातावरण निर्माण केले आहे. सत्ता नाही म्हणून विकासासाठी निर्णय घ्यावा लागला, असे सांगणारे बघितले की आश्चर्य वाटते. खरं म्हणजे विरोधी पक्षात असलो की अधिक काम करता येते”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला.

नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. ती जाऊन कार्यकर्ते उत्साहित व्हावे म्हणून नेरूळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पवार बोलत होते. देशात महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्याचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

- Advertisement -

आज देशात अनेक प्रश्न आहेत. बेकारी बिकट झाली आहे. अनेक कंपन्यांनी आपण कामगार कमी केल्याचे घोषित केले आहे. सत्ता आल्यावर रोजगार निर्मितीचे काम केले पाहिजे; पण सत्ता आल्यावर रोजगार बंद करण्याचे काम या सरकारने केले आहे. एकेकाळी मुंबईमध्ये गिरणी कामगार दिसायचे. मुंबईत १२० गिरण्या होत्या पण आज आठ ते सात गिरण्या बाकी आहेत. आजच्या राज्यकर्त्यांची नीती ही कष्टकरांच्या हाताला मान देणाऱ्यांची नाहीतर मूठभर श्रीमंतीच्या मागे उभी राहण्याची आहे, असा टोला पवार यांनी हाणला.

लातूर भूकंप भयानक होता. त्यावेळी मी स्वतः उभा राहिलो. संकटकाळी राज्यकर्त्यांनी उभे राहणे गरजेचे आहे. पण आज राज्यकर्ते पुरासारखे संकट आल्यावरही महाजनादेश यात्रेत मग्न आहेत. सामान्य लोक वेळ आल्यावर आपला राग व्यक्त करतील. नवी मुंबईबद्दल सांगण्याची गरज नाही. चुकलो तर लोक दाखवून देतात. मंदा म्हात्रे जिंकल्या कारण नाईक कुठे तरी चुकले होते. ते चूक सुधारतील असे वाटले होते, तरी देखील ते आज चुकीच्या मार्गावर गेले आहेत, असेही शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे यांनीही नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय इतर काही नेत्यांचा प्रवेश शिवसेना, भाजपात होण्याची शक्यता आहे. यात छगन भुजबळ, आमदार रामराजे निंबाळकर या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. याआधी शिवेंद्रराजे भोसले, सचिन अहिर, संदीप नाईक, राणाजगजीत सिंह, चित्रा वाघ, धनंजय महाडिक, दिलीप सोपल, मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड, विजयसिंग मोहिते पाटील यांचा मुलगा रणजीत सिंग मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ सोडून भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठं खिंडार पडलं आहे.

हे वाचा – उदयनराजेंची राष्ट्रवादीवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -