घरताज्या घडामोडी१०वी, १२वीच्या परीक्षांच्या तारखांबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती!

१०वी, १२वीच्या परीक्षांच्या तारखांबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती!

Subscribe

कोरोनाचं संकट अजूनही नियंत्रणात आलेलं नसताना आता १०वी (SSC) आणि १२वीच्या (HSC) परीक्षा होणार की नाही? आणि होणार तर कधी होणार? याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावू लागली आहे. या पार्श्वभूमीवर CBSE बोर्डाने १०वी आणि १२वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षांचं काय? असा प्रश्न पालक विचारू लागले होते. आता राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीच त्याबाबत खुलासा केला आहे. राज्यात १०वीच्या परीक्षा १ मेनंतर आणि १२वीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे राज्यातल्या बोर्डाच्या परीक्षा होणार यावर शिक्कामोर्तब झालं असून त्या नेमक्या किती तारखेला होणार हे जरी निश्चित झालेलं नसलं, तरी किमान कोणत्या कालावधीमध्ये होणार हे स्पष्ट झालं असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना त्यानुसार अभ्यासाचं नियोजन करता येणार आहे.

दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं. या परीक्षा ४ मेपासून सुरू होणार आहेत. तर १० जूनपर्यंत परीक्षा पूर्ण होतील. दोन्ही वर्षांच्या प्रायोगिक परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहेत. परीक्षांचा निकाल १५ जुलै रोजी लागणार आहे. दरम्यान, CBSE च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र बोर्डाच्या राज्यातल्या परीक्षा कधी होणार, याविषयी चर्चा सुरू झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा नक्की कधी घेतल्या जाणार? याची चिंता पालकांमध्ये होती. आता खुद्द शिक्षणमंत्र्यांनीच त्यावर भूमिका स्पष्ट केली आहे.

सीबीएससीने मे महिन्यातलं टाईमटेबल जाहीर केलं आहे. आम्ही देखील १५ एप्रिलनंतर १२वीच्या आणि १ मे नंतर दहावीच्या परीक्षा घेण्याचा सरकारचा विचार आहे. यापूर्वीच २३ नोव्हेंबर पासून ९ वी ते १२ वी पर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. आता पाचवी ते आठवी पर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेत असताना ब्रिटनमधून कोरोना चा नवा विषणू आल्यामुळे आणखी थोडे दिवसांची वाट बघून यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. पुढचा टप्पा पाचवी ते आठवी पर्यंत टप्पा पूर्ण विचार करून सुरू केला जाईल. राज्यातील परिस्थिती आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती घेऊनच शाळा सुरू केल्या जातील. मुंबई-पुणे व्यतिरिक्त अनेक भागांमध्ये शाळा सुरू झालेल्या आहेत.

वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -