घरCORONA UPDATEबेस्टनंतर आता एसटी ड्रायव्हरच्या केबिनलाही प्लास्टिक शिल्ड; कोरोनापासून होणार बचाव

बेस्टनंतर आता एसटी ड्रायव्हरच्या केबिनलाही प्लास्टिक शिल्ड; कोरोनापासून होणार बचाव

Subscribe

कोरोनासारख्या अदृश्य संकटात जीव धोक्यात घालून एसटीचे चालक-वाहक अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपली सेवा देत आहे. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळाने बेस्ट सारखी शक्कल लढवली आहे. एसटी महामंडळाच्या एसटी बसेसचा ड्रायव्हरच्या केबिनला आयसोलेशनमध्ये रुपांतर करण्याची सुरुवात केली आहे. तसेच ड्रायव्हरच्या केबिनमध्ये असलेला दरवाजा आता पारदर्शक प्लास्टिक शिल्ड लावून बंद करण्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गापासून काही प्रमाणात एसटीच्या चालकांची सुरक्षा होणार आहे. या उपक्रमाचे एसटी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

शहरातील बेस्ट प्रशासनाने आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवेत रुजू असणाऱ्या कामगारांना ने आण करण्यासाठी बसेस सुरू ठेवल्या आहेत. मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील परिस्थिती अतिशय गंभीर होत आहे. आतापर्यत बेस्टच्या शंभरपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत आठ कर्मचारी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बेस्ट प्रशासनाकडून नुकतीच एक शक्कल लढवली होती. ज्यात ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर पारदर्शक सुरक्षा कवच बसविण्यात आले होते. ज्यामुळे प्रवाशांचा आणि बेस्टच्या चालकाचा संपर्क येणार नाही. त्यामुळे कर्मचारी सुद्धा सुरक्षित राहतील. बेस्टची ही योजना यशस्वी झाली आहे. त्यानंतर आता एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी असाच प्रकल्प एसटीमध्ये सुद्धा राबविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर एसटी महामंडळाच्या यंत्र आणि अभियांत्रिकी विभागातील अधिकारी यांनी अत्यंत कमी खर्चामध्ये मुंबई, ठाणे आणि पालघर या विभागातील एसटी बसेसमध्ये ही व्यस्था केली असून एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत वाढ झालेली आहे.

- Advertisement -

तिन्ही विभागात लावणार

एसटी महामंडळाच्या तिन्ही विभागातून जवळ जवळ ३५० पेक्षा जास्त बसेस धावत आहेत. या बसेसच्या ड्रायव्हर केबिनमध्ये दोन दार आहेत. एक चालकाच्या उजव्या बाजूला तर दुसरा जिथून प्रवासी ये-जा करतात तिथे सुद्धा एक दार आहे. त्यामुळे दररोज एसटी कर्मचारी प्रवाशांच्या संपर्कात येत असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा आरोग्याला मोठा धोका होता. एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पारदर्शक प्लास्टिक शिल्ड लावण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील संपूर्णं बसेसला फेस शिल्ड लावण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळातील यंत्र आणि अभियांत्रिकी विभागातील महाव्यस्थापक रघुनाथ कांबळे यांनी दैनिक आपलं महानगरला दिली आहे.

महामंडळाचे सर्वतोपरी प्रयत्न

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस, डॉक्टर, नर्स, मंत्रालय, महापालिका कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी एसटी महामंडळाकडून एसटी बसेसच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येत आहेत. एसटीचा कर्मचारी जिवाची पर्वा न करता आपली सेवा देत आहे. कोरोनापासून संरक्षण मिळावे याकरिता एसटी महामंडळ सर्वतोपरी प्रयत्न करत असून कर्मचाऱ्यांना हॅन्डग्लोज, मास्क, सॅनिटाझर आणि जेवणाची व्यस्था करत आहे. मात्र सेवा बजावत असताना प्रवाशांचा आणि कर्मचाऱ्यांचा बसमध्ये संपर्क येतो. त्यामुळे या संपर्कापासून दूर राहण्याकरिता आता एसटीच्या ड्रायव्हरचा केबिनमध्ये पारदर्शक प्लास्टिक शिल्ड लावली आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -