Video: टिकटॉकवर एसटी कर्मचार्‍यांचा बोलबाला

Mumbai
st employee tik tok video
एसटी कर्मचाऱ्यांचे टिक टॉक व्हिडिओ

जगभरात टिकटॉकने सर्वांना अक्षरशः वेड लावले आहे. खासकरुन देशभरातील तरुणांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत सर्वांनाच टिक टॉकचे व्यसन लागले आहे. त्यातच आता ग्रामीण भागाची लालपरी अर्थात एसटीचे चालक आणि वाहकांनाही टिकटॉकचे वेड लागले आहे. अनेकांनी कर्त्यव्यावर असताना सप्रसिद्ध गाण्यावर व्हिडिओ बनवले आहेत. तर काहींनी गाणे गात असल्याचे गमतीदार व्हिडियो तयार केले आहे. हे व्हिडिओ सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एसटी महामंडळाने एसटी कर्मचार्‍यांना ऑन डयुटी मोबाईल वापरास बंदीचे फर्मान काढले असून सुद्धा आज सर्रास व्हिडीओ तयार करून टिकटॉवर अपलोड करण्यात येत आहे. त्यामुळे टिकटॉकवर एसटीचे हिरों सुसाट धावत आहेत.

मोबाईलवर बोलत असताना एसटी चालक वाहन चालवतांनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे २६ डिसेंबर २०१९ रोजी परिपत्रक काढून एसटीच्या चालक, वाहकांना ऑन ड्युटी मोबाईल वापरास बंदीचे फर्मान एसटी प्रशासनाने जारी केले होते. मात्र तरी सुध्दा आज सर्रासपने एसटीचे चालक वाहक टिकटॉकवर व्हिडिओ तयार करताना दिसून येत आहे.

या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि कॅमेंटसुध्दा मिळत आहेत. नुकतेच एका एसटीच्या वाहकाने एसटी ब्रेक डाउन झाल्यावर त्यांनी वेळ असल्यामुळे ‘मुकाबला ओ मुकाबला’ या गाण्यावर गमतीदार डॉन्स केला. तर एकाने इंदुरीकर महाराजांच्या आवाजातून कर्मचार्‍यांच्या वेतन समस्या मांडल्या. हे व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड होताच तुफान व्हायरल होत आहेत. तर काही प्रमाणात एसटी कर्मचारी सामाजिक उद्देशाचे धडे सुध्दा देताना दिसत आहेत. जेव्हा लोकसभा निवडणूक झाली, तेव्हा एसटीच्या कर्मचार्‍यांनी एसटीच्या प्रवाशांना टिकटॉकच्या माध्यमातून मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले होते.

दैनिक आपलं महानगरला एका एसटीच्या टिकटॉक युजरने सांगितले कि, “आम्ही कर्तव्यावर असताना हे व्हिडिओ तयार करत नाही. मात्र ग्रामीण भागात जेव्हा मुक्कामाने जातो. तेव्हा आम्ही करमणुकीसाठी असे व्हिडिओ तयार करतो.”

लाखोंच्या घरात फॉलर्वस

मार्गात एसटी बस ब्रेक डाऊन झाल्यास, काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास अशा वेळी चालक, वाहक मोकळ्या वेळात टिक टॉक व्हिडिओ तयार करतात किंवा व्हिडिओ बघतात. काही एसटीचे चालक आणि वाहकांना लाखोंच्या घरात फॉलोर्वस आहे. दररोज टिकटॉकवर गमतीदार व्हिडिओं अपलोड करुन मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळत आहे.

मानसिक स्वास्थ्य बिघडले

एसटी कर्मचार्‍यांना प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एसटीच्या चालक आणि वाहकांची आरोग्य तपासणी वैगेरे एसटी महामंडळाकडून करण्यात येते. मात्र आता टिकटॉकमुळे अनेक एसटी कर्मचार्‍यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असून काहींना याचे भयंकर व्यसनच लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळानी या टिकटॉक बनविणार्‍या कर्मचार्‍यांवर आवर घातला पाहिजे.

आधुनिक मनोरंजनाचे साधन म्हणून टिकटॉक प्रसिद्ध आहे. त्यात एसटी कर्मचार्‍यांना प्रसिद्धी मिळावी म्हणून कुठलाही व्हिडिओ अपलोड करत येत नाही. जेव्हा विश्रांतीसाठी वेळ असतो. तेव्हाच मनोरंजनासाठी ते टिकटॉक व्हिडीओ तयार करतात. – श्रींरग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉग्रेस