कोरोना निर्मूलनापेक्षा स्थायीला ठेक्यांत ‘इंटरेस्ट’

येत्या शुक्रवारी विशेष सभा घेण्याचा निर्णय; पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याला मुदतवाढ देण्यासाठी सत्ताधार्‍यांचे प्रयत्न

Nashik municipal office
नाशिक महापालिका मुख्यालय

नाशिक- शहरासह संपूर्ण देशावरच कोरोनाचे महाभयंकर संकट आलेले असताना आणि या आजाराला नियंत्रीत करण्यासाठी महापालिकेच्या कारभार्‍यांनी पुढाकार घेणे गरजेचे असताना प्रत्यक्षात या मंडळींना अजूनही मलाईदार ठेक्यांमध्येच अधिक रस असल्याची बाब मंगळवारी (दि. ८) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत दिसून आली. या सभेत पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यासह अन्य विकास कामांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्यातच धन्यता मानली.
सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या सभेतबिटको रुग्णालयात कोरोना रुग्णालयासाठी लागणार्‍या साहित्याचा ठराव कार्योत्तर मंजूरीसाठी ठेवण्यात आला होता. मात्र या अनुषंगाने विरोधकांनी सत्ताधारी भाजपला कोंडीत टाकण्याचा प्रयत्न केला. कोरोनाबाधित रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत, व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन बेडची वानवा, खासगी हॉस्पिटल्स अव्वाच्या सव्वा बिले आकारतात आदी आरोप सुरु झाल्यानंतर कोरोनासंदर्भात येत्या शुक्रवारी (दि. ११) विशेष सभा घेण्याचा निर्णय सभापतींनी जाहीर केला. त्याचवेळी काँग्रेसच्या सदस्यांना हाताशी धरुन पेस्ट कंट्रोल संदर्भातील पत्र वाचन करण्याचे सूचित केले.