Corona: अखेर अंतिम वर्षाच्या अंतिम सेमिस्टरची परीक्षा देखील रद्द!

Mumbai
exams
प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या एकीकडे वाढत असताना पदवीच्या विद्यार्थ्यांची शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षेचं काय करायचं? हा प्रश्न अजूनही प्रलंबितच होता. अनेकांनी या परीक्षा रद्द करण्याचा पर्याय सुचवला होता. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तसा प्रस्ताव देखील केंद्राला पाठवला होता. मात्र, त्यावर पुन्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जायला हव्यात, अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर राज्य सरकारने माघार घेत राज्यपालांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर अखेर या परीक्षेबद्दल राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी ऑनलाईन पद्धतीने राज्यातल्या जनतेशी संवाद साधताना याबद्दल घोषणा केली. ‘यासंदर्भात राज्यातल्या कुलगुरूंसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. या चर्चेमध्ये शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा न घेण्याचं ठरवण्यात आलं आहे. कारण जूनमध्ये आपण या परीक्षा घेऊ शकत नाही. जुलैमध्ये त्या होतील याची शक्यता नाही. ऑगस्टमध्ये काय होईल याची कल्पना नाही. तोपर्यंत विद्यार्थ्यांना ताटकळत का ठेवायचं. त्यामुळे त्यांच्या पदवीच्या वर्षांच्या गुणांची सरासरी करून त्यानुसार त्यांना शेवटच्या सेमिस्टरचे गुण दिले जाणार आहेत. त्यावर त्यांना पास केलं जाणार आहे. त्यानंतर देखील कुणाला वाटलं की आपेल गुण कमी झाले आहेत, तर त्यांना पुन्हा ऑगस्ट, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर, जसं जमेल तसं पुन्हा परीक्षा देण्याची देखील संधी दिली जाणार आहे’, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं. त्यामुळे आता पदवीच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सेमिस्टरच्या परीक्षांबाबतच्या संभ्रमावर पडदा पडला आहे.