नगर विकास विभागातील कामांना मुख्यमंत्र्यांची स्थगिती

राज्य सरकारने अखेर सुरू न झालेल्या सर्व विकासकामांवर स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत.

Mumbai
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यात सुरु असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर अनेक विकास कामांना ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर राज्य सरकारच्या नगर विकास विभागामार्फत राज्यातील महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायतींमध्ये सुरु न झालेल्या अनेक कामांना ब्रेक लावण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने महानगरपालिकेच्या पायाभूत सुविधांसह इतर कामांचा समावेश आहे. ज्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही, अशा सर्व कामांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आलेला आहे. दरम्यान, ज्या नगरोत्थान प्रकल्पाअंतर्गत कामांचा कार्यारंभ करण्यात आलेला आहे, अशांची माहिती देखील यावेळी मागविण्यात आलेली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

तातडीने अंमलबजावणीचे आदेश

राज्य सरकारच्या नगरविकास विभागामार्फत राज्यातील सर्व नगरपरिषदांचे आयुक्त आणि संचालक, सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व महापालिकांच्या आयुक्तांना नगर विकास विभागामार्फत विविध विकास कामांसाठी वितरित केलेल्या निधीच्या अनुषंगाने स्थगिती देण्याचे फर्मान काढले आहे. या आदेशानुसार राज्यातील महागनरपालिकांमध्ये सुरु असलेल्या पायाभूत सुविधा, महानगरपालिका हद्दवाढ, नवीन नगरपालिका, नगरपालिका हद्दवाढ, नगरपरिषद यात्रास्थळ, नवीन नगरपंचायत, महानगरपालिका ठोक तरतूद, नगरपरिषद ठोक तरतूद, रस्ता अनुदान, महानगरपालिका नगरोत्थान आणि नगरपालिका नगरोत्थान या योजनेअंतर्गत सुरु न झालेल्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय नगर विकास विभागाने जाहीर केला आहे. तर हे आदेश तातडीने अंमलात आणण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले आहेत.

…अन्यथा शिस्तभंगाची कारवाई!

नगर विकास विभागाचे अवर सचिव विवेक कुभांर यांनी हे आदेश दिले आहेत. हे आदेश देताना वरील योजनेपैकी ज्या योजनांमध्ये सरकारने वितरित केलेल्या निधीपैकी ज्या कामाच्या कार्यरंभाचे आदेश देण्यात आलेले नाहीत, अशा सर्व कामांना पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तर नगरोत्थान प्रकल्पाचे कार्यारंभाचे आदेश आलेले नाहीत, अशा कोणत्याही प्रकल्पांचे काम सुरु करण्याचे आदेश देऊ नयेत, अशी ताकीद यावेळी देण्यात आली आहे. तर विशेष म्हणजे, ज्या प्रकल्पांच्या कामांचे कार्य सुरु करण्यासाठी ६ डिसेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत आदेश प्राप्त होणार नाहीत, अशा कामांचे पुढचे आदेश देण्यात आलेले नाही, अशी समज ही यावेळी या आदेशात देण्यात आलेली आहे. या कालावधीपर्यंत ज्या कामांच्या आदेशाच्या प्रति प्राप्त होतील, त्याशिवाय इतर कामे सुरु करण्याचे आदेश दिल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला आहे.