घरCORONA UPDATEराज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार - अजित पवार

राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार – अजित पवार

Subscribe

कोरोनाच्या महाभंयकर संकटातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार असल्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असल्यामुळे राज्यातील सर्व व्यवहार ठप्प आहेत, त्यातून मार्ग काढण्यासाठी मंत्रीमंडळात चर्चा होऊन पॅकेज संदर्भात निर्णय घेऊ, अशी माहिती माध्यम प्रतिनिधींशी बोलताना अजित पवार यांनी दिली.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये केवळ मोठ-मोठे आकडे पाहायला मिळाले. प्रत्यक्षात अन्य राज्यातील जनतेच्या हातामध्ये किती पैसे जाणार, हा मोठा प्रश्नच आहे. गरीब माणसाची दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी चूल पेटते, अशा लोकांना आज मदत करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही केंद्राकडे पत्रव्यवहार करत मागणी केलेली आहे, असेही अजित पवार म्हणाले. ते आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या वॉर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देत वॉर रूमच्या कार्यप्रणालीची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी शहरातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला.

- Advertisement -

पिंपरी-चिंचवड शहरच नव्हे तर संपूर्ण राज्य ‘करोना’ विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असून सामुहिक शक्तीच्या जोरावर करोनाला आपण निश्चितच हरवू, असा ठाम विश्वास पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला. तसेच कोरोनामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. स्वत: काळजी घेतल्यास तसेच स्वच्छता राखून शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन केल्यास आपण करोनावर मात करू शकतो. ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची ही वेळ आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील उद्योग सुरु करायला परवानगी दिली आहे. मात्र कामगार परराज्यात निघून गेल्यामुळे काही अडचणी येत आहेत. वेळ लागेल मात्र परिस्थिती निश्चितच पूर्वपदावर येईल. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पोलीस, डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी करोनामुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना साथ देण्याची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले.

हॉटेल प्रश्नाबाबत मुंबईत बैठक

पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल व्यवसायिक अडचणीत आल्याचा मुद्दा माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांनी अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिला. यावर मुंबईत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येणार आहे. याबाबत हॉटेल असोसिएशनच्या शिष्टमंडळाला मंगळवारी किंवा बुधवारी मुंबईत बैठकीसाठी बोलविण्यात आले असून यावेळी हॉटेल संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -