कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या प्राचीन खजिन्यावर धार्मिक व्यवस्थापकाने मारला डल्ला!

stolen jewellery and coins from Tulja Bhavani treasury
कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या प्राचीन खजिन्यावर धार्मिक व्यवस्थापकाने मारला डल्ला!

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या प्राचीन आणि दुर्मिळ खजिन्यावर मंदिराच्याच धार्मिक व्यवस्थापकाने डल्ला मारला आहे. या धार्मिक व्यवस्थापकाहसह अन्य दोषी अधिकाऱ्यांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावरकर यांनी दिले आहेत. देवीच्या खजिन्यातून अनेक राजे आणि राजवाड्यांकडून दिलेली तब्बल ७१ प्राचीन नाण्यांसह देवीच्या अंगावरील दागिने गायब झाले आहेत. देवीचे दागिने गायब झाल्याप्रकरणी हा पहिलाच गुन्हा दाखल होणार आहे.

संस्थानाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच मौल्यवान माणिक, चांदीचे दोन खडाव गायब केल्याचा अहवाल चौकशी समितीने जिल्ह्याधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यानुसार धार्मिक व्यवस्थापक दिलिप नाईकवाडी यांनी अफरातफर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

देशभरातून श्रद्धेने अनेक भाविक साडेतीन शक्तिपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला येत असतात. पण पहिल्यांदा तुळजाभवानीच्या मंदिरात असा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे भाविकांच्या श्रद्धेलाच तडा गेला आहे. यापूर्वी मंदिराच्या खजिन्यातील भ्रष्टाचाराच्या कारभाराविषयी पुजाची मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे आणि त्यांचे विधिज्ञ शिरीष कुलकर्णी यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. १४ फेब्रुवारी १९८० ते ५ मार्च १९८१ या कालावधी दरम्यान असणारे तत्कालीन उपव्यवस्थापक अंबादास भोसले यांनी अहवालामध्ये सोने, चांदी, भांडीपात्र, चांदीच्या वस्तू, पुरातन नाणी या सर्वांचा उल्लेख केला आहे. पण यानंतर केलेल्या पाहणीमध्ये अनेक पुरातन नाणी गायब झाले असल्याचे चौकशी समितीच्या पाहणी दरम्यान समोर आले. मंदिराच्या खजिन्याच्या एकूण ११ चाव्य होत्या पण यापैकी ३ चाव्या हरवल्या आहेत.

दरम्यान देवीच्या अंगावरील दागिने ठेवण्यासाठी ५ पेट्या आहेत. पण यामधील ४थ्या पेटीत ११ दगिन्यांची नोंद होती. त्यातील चांदीच्या पादुका गायब झाल्याचे आढळले आहे. तसेच ५व्या पेटीमधील अलंकारही गायब झाल्याचे समोर आले आहेत. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर सखोल चौकशी करण्यात आली. त्यावेळेस तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलिप नाईकवाडी यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला. पण अनेक महिन्यांपासून प्रत्यक्षात नोंदविण्यात आला नव्हता. पण गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार याप्रकरणी दिलिप नाईकवाडी यांच्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याबाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेश मंदिर समितीने तथा तुळजापूर तहसीलदार यांना दिला आहे.