घरमहाराष्ट्रआनंदाच्या सरीत वादळाची भीती!

आनंदाच्या सरीत वादळाची भीती!

Subscribe

वादलवारं सुटलं गो
वादलवारं सुटलं गो
वार्‍यानं तुफान उठलं गो
वार्‍यानं तुफान उठलं गो
भिरभिर वार्‍यात, पावसाच्या मार्‍यात
सजनानं होडीला पान्यात लोटलं
वादलवारं सुटलं गो
वार्‍यांन तुफान उठलं गो…

शांता शेळके यांच्या या गाण्यात पाऊस, वादळ, किनारपट्टी आणि किनारपट्टीवरील लोकांची भीतीने उडालेली तारांबळ… असे सारे भाव अचूक शब्दात पकडले आहेत. मंगळवारी पाऊस वेळेवर आनंदसरी होऊन बरसायला सुरुवात झाली असताना निसर्ग नावाचे चक्रीवादळ मुंबईसह उत्तर आणि दक्षिण किनारपट्टीकडे सरकू लागल्याने आनंदाच्या सरीत वादळाची भीती दाटून आली आहे.

- Advertisement -

दुसर्‍या बाजूला करोना विषाणूचा विळखाही अजून सैल होण्याचे नाव घेताना दिसत नसताना वादळाच्या या संकटाने आपल्या समोर आता नवीन कुठले अरिष्ट आले आहे, या चिंतेने मुंबईकर भिरभिर झाले आहेत.

गेले दोन एक दिवस मुंबईसह कोकणात रिमझिम पाऊस पडत होता. विशेष म्हणजे केरळला १ जूनला पाऊस आल्याने तो मृग नक्षत्राला धरून बरोबर ७ जूनला तळकोकणातून महाराष्ट्रात बरसेल आणि त्याचा पुढचा प्रवास सुरू होईल, असा अंदाज आहे. आनंदाची बाब म्हणजे यंदा सरासरीइतका पाऊस होणार असल्याची सुखावणारी बातमी आली होती. पण, अचानक वादळाने सर्व चित्र आता बदलून टाकले आहे. मंगळवारी मुंबईत दुपारपासून अंधारून आले होते. उकाडा असह्य झाला असताना संध्याकाळी पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाल्या. काही मिनिटे कमी जास्त प्रमाणात त्या मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणी बरसल्या. कोकणात मात्र दुपारपासूनच वेगवान वार्‍यासह पाऊस पडत होता.

- Advertisement -

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बुधवारी वादळ मुंबईच्या किनार्‍यावर धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, या वादळाचे चक्रीवादळात रुपांतर झाले असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. चक्रीवादळाचे निसर्ग हे नाव बांगलादेशने प्रस्तावित केले असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे. वारे ताशी सुमारे १०० किलोमीटर वेगाने वाहू शकतात. मुंबई महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकार्‍यांनी मंत्रालयातील राज्य सरकारी अधिकार्‍यांशी भेट घेऊन या परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी सकाळपर्यंत तीव्र डिप्रेशनमध्ये बदलेल. यामुळे मुंबईत मंगळवारी रात्री ते बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वादळाचं गांभीर्य लक्षात घेता हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. रविवारी हवामान खात्याने याबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला होता, परंतु सोमवारी तो बदलून रेड करण्यात आला होता.

पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळापासून बचाव करण्यासाठी राज्य सरकारने पालिकेला अनेक सूचना दिल्या आहेत. ज्या रूग्णालयात करोना रूग्णांवर उपचार केले जात आहेत, तिथे लाईट जाता कामा नये याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करावी. खुल्या मैदानात बांधलेल्या कोविड केंद्रांची परिस्थिती पाहूनच तिथे रुग्णांना दाखल केले जावे. तिथे दाखल असलेल्या रूग्णांना गरज भासल्यास इतरत्र हलवण्याची तयारी ठेवली पाहिजे. जिथे सखल भागात पाणी भरण्याची शक्यता आहे तिथे क्विक रिस्पॉन्स टीमला आवश्यक असल्यास अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी तयार ठेवावे, असा सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईत एनडीआरएफची 3 पथके तैनात
मुंबईला निसर्ग चक्रीवादळापासून वाचवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला (एनडीआरएफ) ची तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. ६ पथके राज्याच्या इतर भागात पाठवण्यात आली आहेत. ही पथके किनारपट्टी भागात तैनात करण्यात आली आहेत. मुंबईशिवाय पालघर इथे दोन आणि ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आले आहे.

मुंबई किनार्‍यापासून वादळ सुमारे ६०० किमी अंतरावर असून ते तीव्र रूप धारण करू शकते आणि नंतर उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधून वेगाने पुढे जाईल. या काळात मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड इथे १०० ते २०० मिलीमीटर पाऊस पडेल. वादळाचा सर्वाधिक परिणाम पालघरमध्ये दिसून येतो. ४ जूनच्या सकाळपर्यंत, त्याचा परिणाम सौम्य होईल असेही सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -