घरमहाराष्ट्रएसटीच्या ऑनलाईन बुकिंगला प्रवाशांची पसंती

एसटीच्या ऑनलाईन बुकिंगला प्रवाशांची पसंती

Subscribe

महाडमधून ४७ बसेस आरक्षित

कोकणातील गणेशभक्तांना परतीचा प्रवासदेखील सुखकर व्हावा म्हणून एसटीने सुरू केलेल्या ऑनलाईन बुकिंगला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. परतीच्या प्रवासासाठी येथून ४७ बसेस आरक्षित झाल्या आहेत. या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. ठाणे, बोरिवली व नालासोपारा यासाठी बुकिंग अधिक झाले आहे.

गेली कित्येक वर्षे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सुरत आणि बडोदा येथील कोकणवासीय चाकरमानी गणेशोत्सवाला आपल्या गावाला आवर्जून जातात. यामुळे एसटी आणि कोकण रेल्वेवर अधिक ताण पडतो. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एसटीकडून प्रतिवर्षी विविध बदल करून सेवा दिली जात आहे. यावर्षीदेखील कोकणवासियांसाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. संपूर्ण कोकणात मुंबई आणि इतर ठिकाणाहून गावी येण्यासाठी एसटीच्या २५ शेहून अधिक बसेस यावर्षी आरक्षित आहेत.

- Advertisement -

मुंबई-गोवा महामार्गावरील महाड महत्त्वाचे स्थानक असून, येथून मुंबई, पुणे आणि कोकणात जाणार्‍या बसेस सहज उपलब्ध होत असतात. तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिक हे मुंबई आणि इतर मोठ्या शहरात नोकरीनिमित्त स्थलांतरित झाले आहेत. गणेशोत्सवाला हे सारेजण पुन्हा आपल्या गावी येत असल्याने एसटीची थेट गावापर्यंत सेवा देण्यात येत आहे. यामुळे गावातूनच बस उपलब्ध होत असल्याने या सेवेला प्रतिसाद वाढला आहे. त्यातच खाजगी वाहनांचे गणेशोत्सव काळातील वाढीव दर, असुरक्षित प्रवास, कोकण रेल्वेमधील गर्दी आदी कारणास्तव एसटी प्रवास पसंत केला जात आहे. येथून पनवेलपर्यंत देखील बसेस सोडण्यात येणार आहेत.

आगारातून नियमित जाणार्‍या २२ फेर्‍या आहेत. हे सर्व बुकिंग ७ ते ८ सप्टेंबर या काळातील आहे. सध्या आगाराकडे बसेसचा तुटवडा आहे. ऐन सणाच्या काळात करण्यात आलेले आरक्षण आणि वाढणारी संख्या पाहता गणेशोत्सव काळात जादा बसेसची गरज भासणार आहे. यासाठी महामंडळाला कसरत करावी लागणार आहे.

- Advertisement -

महाड आगारातून आतापर्यंत ४७ बसेस आरक्षित झाल्या आहेत. एसटीच्या ऑनलाईन बुकिंगला कोकणवासीयांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. या काळात उत्तम आणि सुरक्षित सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
-ए. पी. कुलकर्णी, आगार व्यवस्थापक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -