तहसीलदारांच्या बैठकीनंतरही कारवाई शून्य!

पालीत मोकाट गुरांचा त्रास

Mumbai

पाली शहर आणि परिसरातील मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी बैठक घेऊनही कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे समस्या जैसे थे असल्याने लोकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मोकाट गुरांमुळे एखादा अनर्थ घडला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बैठ्या घरांची जागा बहुतांश ठिकाणी उंच इमारतींनी घेतल्यामुळे गुरांचे गोठे जवळ-जवळ कालबाह्य होत आहेत. त्यामुळे गुरे एैसपैस ठिय्या मारण्यासाठी चक्क रस्त्यांचा आधार घेत आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांसह वाकण-पाली-खोपोली, तसेच पाली-माणगाव मार्गावर गुराढोरांचा वावर वाढला आहे. याचा नागरिकांप्रमाणे वाहनचालक आणि प्रवाशांना त्रास होत आहे. रस्त्यात बसकण मारणारी गुरे वाहनांच्या हॉर्नलाही जुमानत नसल्याचे दृश्य अनेकदा पहावयास मिळते. बसलेल्या किंवा आरामात फिरणार्‍या गुरांमुळे बाजारपेठेत चालणे मुश्कील होत असल्याने याबाबत अनेकदा तक्रारीही झाल्या आहेत.

मोकाट गुरांचा शेतकर्‍यांनाही फटका बसत आहे. अनेकदा बाजारपेठेत दुकानात गेलेल्या ग्राहकांच्या मोटरसायकलला लावलेली पिशवी ही गुरे हिसकावून काढतात. काही दिवसांपूर्वी एका बैलाने भर बाजारपेठत धुडगूस घालून सर्वांना पळता भुई थोडी केली होती. बैलांच्या झुंजीसुद्धा पहावयास मिळतात. उधळणार्‍या गुरांमुळे काही काळ वातावरण तंग होते. मोकाट गुरांबाबत तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी बैठकही आयोजित केली होती. मात्र पुढे कोणतीच ठोस कारवाई झाली नाही.