coronavirus : भारतीयांनो, अजुन एक शक्यता मावळली

करोनाचा व्हायरस हा उच्च तापमानात पसरत नाही याबाबतचे अनेक तर्क वितर्क आणि अभ्यासावर आता पाणी फिरणार आहे. भारतात यंदाचा उन्हाळा तीव्र नसेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) कडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भारतीयांना करोनाच्या प्रसारासाठीची ही अपेक्षा आता मावळण्याच्या मार्गावर आहे. येत्या दोन आठवड्यात संपुर्ण भारतात तापमान हे सरासरीपेक्षा खाली असेल असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.

आगामी महिन्यात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातही तापमानाचा पारा हा ४० डिग्रीच्या खाली राहील असा अंदाज आयएमडीने मांडला आहे. येत्या २८ दिवसांसाठी मांडलेल्या अंदाजामध्ये यंदा उन्हाळा कमी त्रासाचा असेल असे आयएमडीचे म्हणणे आहे. मध्य भारतातही पारा कमीच राहील असा अंदाज आयएमडीने मांडला आहे. देशात सरासरीपेक्षाही कमी तापमानाचा उकाडा असेल असा अंदाज आयएमडीने मांडला आहे. येत्या दोन ते दिवसात मध्य भारतात तसेच उत्तर भारतात पावसाचे वातावरण असेल. काही ठिकाणी पावसाचा अंदाजही आयएमडीने व्यक्त केला आहे. येत्या दोन आठवड्यात तापमान वाढणार नसल्याचेही आयएमडीने स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी मॅसेचसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने मांडलेल्या अभ्यासानुसार उष्ण वातावरणात करोनाचा प्रसार धीम्या गतीने होतो असा अभ्यास मांडला होता. पण या अभ्यासावर कोणतेही शिक्कामोर्तब झाले नव्हते. त्यामुळे भारतात पडणारा अवकाळी पाऊस ही करोनाचा वेग रोखणार की येत्या दिवसात सुर्य आपले तेज दाखवणार हे लवकरच करोनाच्या आकडेवारीतून स्पष्ट होईल.