पत्नीने पतीचा मृतदेह घराच्या अंगणात जाळला

Pune
RJD Leader murder in bihar
प्रातिनिधिक फोटो
किरकोळ वादवादीनंतर मुलांनी ढकलून दिल्याने पतीचा झालेला मृत्यू लपविण्यासाठी पत्नीने पतीचा मृतदेह घराच्या अंगणात जाळल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वडगाव शिंदे या गावात उघडकीस आली. निलेश कांबळे वय वर्षे ३५ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मयत निलेशला दारूचे व्यसन होते. निलेशची पत्नी विद्या बाहेर गेल्या असता त्याने आपल्या मुलांना जेवण वाढायला सांगितले. यावरून निलेशमध्ये आणि त्याच्या मुलांमध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात मुलांनी निलेशला ढकलून दिले. या धक्क्यानंतर निलेश घरातील भिंतीवर जोरात आपटला आणि खाली कोसळला. आपले वडील उठत नसल्याचे बघत घाबरलेल्या मुलांनी घराला बाहेरून कडी लावली आणि निघून गेले.काही वेळाने घरी परतलेल्या आईला मुलांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर विद्या यांनी जवळ जाऊन पाहिले असता निलेशचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपल्या मुलांचा बचाव करण्यासाठी विद्या यांनी लाकडे आणि इतर साहित्याच्या मदतीने घरासमोरील अंगणातच निलेशचा मृतदेह जाळला. त्यानंतर अर्धा जळालेला मृतदेह शौचालयाच्या टाकीत टाकून दिला. या प्रकाराची कुणकुण निलेशच्या भावाला लागल्यामुळे त्याने या सगळ्याची माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.