कोरोनाविरोधात पुण्याला सर्वाधिक वैद्यकीय वस्तूंचा पुरवठा

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सुरुवातीच्या काळात पुणे व कोकण विभागाला सरकारकडून सर्वाधिक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यात आला.

The Haffkine Institute will conduct research on rabies, swine flu
हाफकिन संस्था

कोरोनाविरोधात लढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा करण्यात येत होता. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सुरुवातीच्या काळात पुणे व कोकण विभागाला सरकारकडून सर्वाधिक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यात आला. मात्र त्यानंतर अन्य विभागांमधील वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय साहित्याचे वितरण केल्याचे दिसून येत आहे.

मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता राज्यातील विविध सामाजिक संघटना, संस्था आणि कंपन्यांनी आपल्या सीएसआर निधीतून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय साहित्य आणि वस्तूंचा पुरवठा राज्य सरकारला करण्यास सुरुवात केली. सीएसआर अंतर्गत येणार्‍या वैद्यकीय वस्तू आणि साहित्याचा साठा आणि वितरणाची जबाबदारी हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळावर सोपवण्यात आली होती. वैद्यकीय वस्तू आणि साहित्याचे वितरण सुरळीत व्हावे यासाठी हाफकिनकडून राज्याचे सहा विभाग करण्यात आले होते. कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद या सहा विभागांत सर्व जिल्हे विभागण्यात आले आहेत. त्यानुसार २४ मार्चपासून कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत मंत्रालयातील आदेशानुसार हाफकिनकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांना वैद्यकीय वस्तू व साहित्यांचा पुरवठा करण्यात येत होता. पुण्याबरोबरच सातारा, सांगली व कोल्हापूरमधील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेतला पुणे विभागाला सर्वाधिक वैद्यकीय वस्तू व साहित्याचा पुरवठा करण्यात आला. त्याखालोखाल मुंबईतील रुग्णसंख्या लक्षात घेता कोकण विभागाला साहित्य पुरवठा करण्यात आल्याची माहिती हाफकिन जीव-औषध महामंडळाकडून देण्यात आली.

haffakin

मुंबईतील महत्त्वाच्या हॉस्पिटलना पुरवठा

कोरोनाचा लढा देण्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय वस्तू आणि साहित्यचा पुरवठा जिल्हानिहाय करण्यात आला. मात्र मुंबईतील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जे.जे., सेंट जॉर्ज, जी.टी. आणि कामा हॉस्पिटललाही मोठ्या प्रमाणात वैद्यकीय साहित्य पुरवण्यात आले. या हॉस्पिटलना एन९४, फेस मास्क, व्हेंटीलेटर, हॅण्ड ग्लोव्हज, पीपीई किट आणि सॅनिटायझरचे मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात आले.