घरमहाराष्ट्रलहान नाल्यांमधील गाळ टाकणाऱ्या कंत्राटदाराला ६ कोटींची रसद

लहान नाल्यांमधील गाळ टाकणाऱ्या कंत्राटदाराला ६ कोटींची रसद

Subscribe

गाळाच्या तपासणीवरील निर्बंध शिथिल

मुंबई शहर व उपनगरामधील २४ विभागातील रस्त्यालगतच्या लहान नाल्यांमधील गाळ काढण्यात आला आहे. हा काढलेला गाळ गोळा करून वाहनांद्वारे मुंबईबाहेरील भिवंडी परिसरातील खासगी जागेत टाकण्यासाठी मुंबई महापालिका कंत्राटदाराला तब्बल ६ कोटी रुपयांची ‘रसद’ पुरवणार आहे. मात्र या गाळाची तपासणी पूर्वीप्रमाणे कडक व काटेकोरपणे करण्याबाबतच्या नियमांत काहीसे बदल करून ते शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे त्याचा लाभ कंत्राटदारालाच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रस्तावाला विरोधी पक्ष भाजपकडून कदाचित तीव्र विरोध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई शहर व उपनगरातील रस्त्यालगत असलेल्या लहान नाल्यांची सफाई, ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’द्वारे काही स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांमार्फत व महाबली संयंत्रामार्फत वेळोवेळी करण्यात येते. मान्सूनपूर्व काळात मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात येतो. ही कामे विभाग कार्यालय स्तरावर करण्यात येतात. या लहान नाल्यांमधील गाळ सुकण्यासाठी रस्त्यालगतच ठेवण्यात येतो. हा गाळ बराच काळ पडून राहिल्यास रहदारीला अडथळा निर्माण होतो. तसेच, परिसरात अस्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. यासाठीच सदर गाळ गोळा करून वाहनांद्वारे उचलून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असते.

- Advertisement -

या गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका भाडे तत्वावर यंत्रणा व वाहने घेते. गतवर्षी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराचा कालावधी संपुष्टात येत असल्याने कंत्राटदाराकडून ही सुविधा भाडे तत्वावर घेण्यात येत आहे. त्यासाठी पालिकेने टेंडर काढले होते. त्यानुसार, पालिकेने २४ वार्डातील ७ परिमंडळाचे ६ गट बनवले आहेत. परिमंडळ १-२ चे कंत्राटकाम मे. साहिल इंटरप्राईजला देण्यात येणार असून त्यासाठी त्याला प्रति टन गाळासाठी ६८० रुपये दराप्रमाणे ६८ लाख रुपये देण्यात येणार आहेत. तर परिमंडळ ३ साठी मे. के.के. कॅरिअरला कंत्राटदार म्हणून नेमण्यात येणार असून त्यासाठी प्रति टन ६६० रुपये याप्रमाणे १ कोटी १९ लाख रुपये, परिमंडळ -४ साठी मे. सनरेज इंटरप्रायजेस या कंत्राटदाराला प्रति टन ५५८ रुपये याप्रमाणे ५५ लाख ८० हजार रुपये, परिमंडळ – ६ साठी मे. के.के.कॅरिअरला प्रति टन ६६० रुपये याप्रमाणे २ कोटी ३१ लाख रुपये, परिमंडळ – ७ साठी मे. फाल्गुनी इंटरप्रायजेसला प्रति टन ५२२ रुपये याप्रमाणे १ कोटी ५ हजार रूपये देण्यात येणार आहेत. फक्त परिमंडळ -५ चा अपवाद ठरला असून संबंधित कंत्राटदाराशी वाटाघाटी करून दर कमी करण्यात येत आहेत. त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे.

सदर कंत्राटदार नाल्यातील गाळ वाहनांद्वारे भिवंडी येथील ओवळी या गावातील खासगी जागेत परवानगीने टाकण्यात येणार आहे. मात्र हा गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांवर पालिकेच्या पर्जन्य जल विभागाच्या अभियंत्याला आणि चाचणी लेखा परीक्षा व दक्षता अधिकारी यांना देखरेख ठेवण्यास मनाई करण्यात आली असून केवळ प्रमुख अभियंता (दक्षता) यांनाच देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -