मला ईडी, सीबीआय नोटीस काढून दाखवा

Mumbai
supriya sule wealth

आगामी विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान देताना दिसत आहेत. यातच तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षांतील नेत्यांवर होणार्‍या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे संतापल्या आहेत. माझ्यावर ईडी किंवा सीबीआयची नोटीस काढून दाखवावी, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले आहे. सुप्रिया सुळे ‘संवाद ताईंशी’ या कार्यक्रमानिमित्त सोलापूर दौर्‍यावर होत्या. यावेळी त्यांनी व्यापारी, विद्यार्थी, वकील, वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला.

मला पत्रकारांनी विचारले की, तुम्ही सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहात, मात्र जर तुम्हाला ईडीची नोटीस आली तर आवाज उठवणार का? त्यावर मी त्यांना सांगते की, सरकारने मला ईडी किंवा सीबीआयची नोटीस पाठवूनच दाखवावी. मी जर काही केलेच नाही तर मला कशाची नोटीस पाठवणार ? सुरुवातीला थोडासा त्रास होईल. मात्र शेवटी मीच जिंकणार आहे, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजप, शिवसेनेत जाणार्‍या नेत्यांवरही सडकून टीका केली. जे कुणी पक्ष सोडून जात असतील त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. मात्र अनेक वर्षे सोबत असलेले सहकारी सोडून जात असल्याचे दु:खही होत आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मोबाईल कंपनीने चांगली ऑफर दिली की लोक मोबाईल बदलतात, त्याप्रमाणे ऑफर मिळाली की लोक विचारधारा वगैरे न बघता पक्षांतर करत आहे, अशी खंत सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवली. यंदाच्या निवडणुकीच्या निकालाची मला प्रचंड उत्सुकता असून पक्षांतर केलेल्या लोकांना तिकडे किती मते मिळतात, हे पाहायचे आहे. पक्षांतर केलेल्या नेत्यांमुळे सरकार कोणाचेही आले तरी मंत्री आमचेच होणार, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी यावेळी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here