घरमनोरंजनSushant Singh प्रकरणावर बिहारचे DGP गुप्तेश्वर पांडे बोलतात, महाराष्ट्राचे DGP सुबोध जयस्वाल...

Sushant Singh प्रकरणावर बिहारचे DGP गुप्तेश्वर पांडे बोलतात, महाराष्ट्राचे DGP सुबोध जयस्वाल गप्प का?

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाने राज्याची बेअब्रू...बिहारचे पोलीस महासंचालक पांडे यांनी एक दिवस आम्ही अजून वाट पाहू आणि त्यानंतर मुंबई पोलिसांविरोधात कारवाई करू. आम्ही यासंबंधी बिहार सरकारकडून सल्ला घेत असून न्यायालयात जाण्याचा मार्गही निवडू शकतो, अशी प्रतिक्रिया एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. तरीही महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह हातावर हात ठेवून गप्प बसल्याबद्दल पोलीस दलात कमालीची नाराजी पसरली आहे.

अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या तपासावरुन बिहार पोलीस आणि महाराष्ट्र तसेच मुंबई पोलीस आमने-सामने असताना बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे दररोज महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर खुलेआम ताशेरे ओढत आहेत. मात्र, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल गप्प का? जयस्वाल महासंचालक महाराष्ट्राचे आहेत की ते केंद्र सरकारच्या इशार्‍यावर गप्प आहेत, असा सवाल आता वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांमधून विचारला जात आहे. बिहारचे पोलीस महासंचालक पांडे यांनी एक दिवस आम्ही अजून वाट पाहू आणि त्यानंतर मुंबई पोलिसांविरोधात कारवाई करू, असे वक्तव्य केले आहे. आम्ही यासंबंधी बिहार सरकारकडून सल्ला घेत असून न्यायालयात जाण्याचा मार्गही निवडू शकतो, अशी प्रतिक्रिया एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.

तरीही महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह हातावर हात ठेवून गप्प बसल्याबद्दल पोलीस दलात कमालीची नाराजी पसरली आहे. पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्याचे काम हे लीडरने करायचे असते. तपास आणि चौकशीच्या बाबतीत स्कॉटलँड यार्ड पोलिसांसोबत तुलना होणार्‍या मुंबई पोलिसांना बिहारचे पोलीस आव्हान देतात आणि इथले पोलीस प्रमुख गप्प बसतात. याबाबत आता वरिष्ठ पोलीस दलातच चर्चा सुरू झाल्या असून, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी हे चार दिवसांनंतरही क्वारंटाईन आहेत. त्याबद्दल बिहार पोलीस कायदेशीर मार्गाने मुंबई पोलिसांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. बिहारचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी एएनआयशी बोलताना गुरुवारी ही माहिती दिली आहे. सुशांत सिंहचे वडील के. के. सिंह यांनी पटणा येथे झीरो एफआयआर केल्याने तपासासाठी बिहारमधून मुंबईत आलेल्या विनय तिवारी यांना रविवारी रात्री गोरेगावच्या एसआरपीएफच्या गेस्ट हाऊसमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. तिवारी यांना अद्यापही मुुंबईत क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना नजरकैदेत ठेवल्यासारखी परिस्थिती आहे. महाधिवक्तांशी चर्चा केल्यानंतर आम्ही काय कारवाई करायची याचा निर्णय घेऊ. न्यायालयात जाणे हा देखील एक पर्याय आहे, असेही बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता बिहार पोलीस विरुद्ध महाराष्ट्र पोलीस असा सामना न्यायालयातही रंगण्याची चिन्हे आहेत.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आता वेगळे वळण घेताना दिसत आहे. मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यातच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. बिहार पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी,‘ महाराष्ट्र सरकारला जर मुंबई पोलिसांवर गर्वच असेल, तर त्यांनी सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ५० दिवसांत काय केले ते सांगावे असे बोलून एकप्रकारे आव्हानच दिले आहे. महाराष्ट्राचे गृहसचिव फोन उचलत नाहीत. बिहार पोलिसांचे फोनही घेत नाहीत. पूर्ण संवाद मुंबई पोलिसांनी थांबवला आहे, असा आरोप पांडे यांनी केला आहे. मुंबई पोलीस व सरकार सहकार्य करत नसल्याचा आरोप बिहार पोलिसांनी केला आहे. आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना बिहारला परतण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सहकार्य केले पाहिजे. त्यांना कैदी बनवून ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारला कुठलाही अधिकार नाही. मुंबई पोलिसांचे वर्तन कायद्याला धरून नाही. मुंबई पोलिसांच्या या गैरवर्तनाचा तीव्र निषेध करतो, असे जाहीरपणे महासंचालक पांडे हे बोलत असूनही राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह गप्प का, असा प्रश्न आता पोलिसांमधूनच विचारला जात आहे.

- Advertisement -

यावर मुंबईतील वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, विनय तिवारी मुंबईत विमानाने आल्यानंतर त्यांना पोलिसांनीच गाडीने गोरेगावच्या एसआरपीएफच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवले. मागील चार दिवस त्यांची व्यवस्था ही मुंबई पोलिसच करीत असून तिवारी यांच्या १४ दिवसांच्या क्वारंटाईनबाबतचा निर्णय हा पोलिसांनी घेतला नसून तो सर्वस्वी मुंबई महापालिकेचा निर्णय आहे.

पोलीस महासंचालक हे राज्याचे असतात. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार आहे. ज्याप्रकारे बिहारचे पोलीस महासंचालक हे पोलीस तपासाबाबत जाहीर बोलत असताना, ज्या राज्यात गुन्हा होतो ती केस तपासण्याचा आणि चौकशी करण्याचा सर्वस्वी अधिकार हा त्या राज्याचा असतो हे जाहीरपणे जयस्वाल का बोलत नाहीत? सीबीआयचा हस्तक्षेप चुकीचा असून याबाबतीत आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असा सवाल जयस्वाल करीत नसल्याने पोलीस दलातूनच नाराजी व्यक्त होत आहे. जरी मुंबई पोलीस आणि महासंचालक यांचे कार्यक्षेत्र वेगळे असले तरी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे बोलणार्‍या महासंचालक पांडे यांना त्याच भाषेत बोलणार्‍या अधिकार्‍याची राज्याला गरज आहे, असेही उपायुक्तांपासून वरिष्ठ दर्जाचे अधिकारी बोलत आहेत.

महासंचालक हा राज्याचा असतो. कुठल्याही पोलिसांबद्दल इतर राज्याचा पोलीस प्रमुख कारवाई करण्याची भाषा करीत असेल तर गप्प राहिल्यावर संशयाला जागा मिळते. त्यामुळे महासंचालक जयस्वाल यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

कोण आहेत सुबोध जयस्वाल?

१९८५ च्या बॅचचे सुबोध जयस्वाल हे बिहारच्या गुप्तेश्वर पांडे यांना सीनियर आहे. पांडे हे १९८७ च्या बॅचचे आहेत. त्यामुळे आपल्याला ज्युनियर असणारा अधिकारी राज्याच्या प्रमुखांना आव्हान देत असताना जयस्वाल सारखे अधिकारी गप्प का, असा सवाल अनेकांना बुचकळ्यात टाकणारा आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये निवृत्त होणार्‍या जयस्वाल यांच्याकडे अजून दोन वर्षे आहेत. या काळात जयस्वाल यांना पुन्हा केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्याचे स्वप्न आहे. यापूर्वी ते ‘रॉ’मध्ये ९ वर्षे कार्यरत होते. तसेच महासंचालक होण्यापूर्वी त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. मध्यंतरी जयस्वाल दिल्लीचे पोलीस आयुक्त होतील अशी चर्चा होती.

बिहारचे दबंग अधिकारी गुप्तेश्वर पांडे

१९८७ च्या बॅचचे गुप्तेश्वर पांडे हे बिहारमधील दबंग अधिकारी म्हणून ओळखले जातात. मुळगाव बक्सर असलेल्या पांडे यांचा एसपी ते महासंचालक असा त्यांचा ३२ वर्षांचा प्रवास आहे. बिहारमधील नशामुक्ती अभियान आणि दारूबंदीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. मात्र २००९ साली त्यांनी राजकारणात येण्यासाठी पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांना बक्सरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवायची होती. मात्र ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पुन्हा ९ महिन्यातच पोलीस दलात येण्यासाठी अर्ज केला. पोलीस दलात आल्यानंतर ते फेब्रुवारी २०१९ मध्ये बिहारचे पोलीस महासंचालक झाले.

दरम्यान, बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने बिहारच्या पोलीस अधिकार्‍याला क्वारंटाईन करण्याचा मुंबई पोलिसांचा निर्णय अव्यवहार्य असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. विनय तिवारी यांना सोडण्यासाठी महापालिका आयुक्तांना पाटणाच्या आयजींनी पत्र पाठवले होते. हे पत्र महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू यांनी फेटाळून लावले आहे. म्हणजेच विनय तिवारी यांना आता १४ दिवस मुंबईत क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. आता विनय तिवारींची बीएमसीने कोरोना चाचणी केली तर त्यांचा अहवालही पॉझिटिव्ह येईल असा आपल्याला संशय आहे, असा आरोपही बिहारचे महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला. त्यामुळे पांडे यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एखाद्या प्रवक्त्याची नेमणूक करावी लागण्याची चिन्हे आहेत.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -