सुशांतचे मारेकरी, मुव्ही माफिया,ड्रग्स तस्कर आदित्यसोबत असतात

kangana ranaut
अभिनेत्री कंगनाचा खळबळजनक आरोप

चार दिवसांच्या आपल्या मुंबई दौर्‍यानंतर अभिनेत्री कंगना पुन्हा हिमाचल प्रदेशमध्ये परतली आहे. तेथे गेल्यावर ट्विट करत कंगनाने राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेंवर प्रथमच लक्ष्य केले आहे. सुशांतचे मारेकरी, मुव्ही माफिया आणि ड्रग्स तस्कर ही सगळी मंडळी आदित्य यांच्यासोबत असतात, असा खळबळजनक आरोप कंगनाने केला आहे.

‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मूळ समस्या अशी की मी मुव्ही माफिया, सुशांत सिंह राजपूतचे मारेकरी आणि त्यांच्या अंमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. ही सगळी मंडळी ठाकरे यांचे लाडके चिरंजीव आदित्य यांच्यासोबत असतात. हा माझा मोठा अपराध आहे. म्हणूनच माझा बंदोबस्त करण्यामागे ते आहेत. पण ठिक. आता बघू कोण कुणाचा बंदोबस्त करतो,’ असे ट्विट कंगनाने केले आहे.

कंगनाने सोमवारी 5 च्या सुमारास हे ट्विट केले. कंगनाने प्रथमच आदित्य ठाकरेंविरोधात ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे. सुशांतच्या हत्येत सहभागी असणारे, अमली पदार्थाच्या तस्करीत असणारे आदित्य यांचे साथीदार असल्याचे दोन गंभीर आरोप कंगनाने केले आहेत. कंगनाने रविवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली होती. सोमवारी सकाळी ती हिमाचल प्रदेशाला गेली.