११ वर्षांचा पगार थकवला; शिक्षकाने कुटुबांसहीत शाळेतच थाटला संसार

Bhaskar Lokhande Nanded
शिक्षक भास्कर लोखंडे यांचे आगळेवेगळे आंदोलन

नांदडे जिल्हाच्या अर्धापूर येथील एका शिक्षकाने आपली मागणी पुर्ण करण्यासाठी हटके पद्धतीने आंदोलन सुरु केले आहे. अर्धापूर शहरातील मीनाक्षी देशमुख मेमोरियल गर्ल्स हायस्कूलमध्ये २२ वर्षांपासून भास्कर लोखंडे हे ज्ञानदानाचे काम करत आहेत. मात्र मागच्या ११ वर्षांपासून त्यांना वेतनच मिळालेले नाही. थकीत वेतन आज ना उद्या मिळेल, या आशेवर ११ वर्ष निघून गेली. दरम्यान त्यांनी संस्थाचालक, शिक्षण विभाग यांच्याकडेही वारंवार तक्रार दिली. कुठूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी आपल्या मुलांसहीत गॅस, शेगडी आणि संसाराचे इतर साहित्य घेऊन आपला मुक्काम शाळेतच हलविला. सध्या ते शाळेतच मुला बाळांचे पोषण करत असून शाळेत राहत आहेत.

राज्यातील हजारो शिक्षकांना लोखंडे यांच्याप्रमाणे खासगी संस्थाचालकांकडून वेतनासाठी संघर्ष करावा लागतो. यापैकी कुणी उपोषणाला बसतात, तर कुणी आंदोलने, निवेदने देऊन आपल्या मागण्या मांडत असते. मात्र भास्कर लोखंडे यांनी हटके पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. लोखंडे यांच्या पत्नीचे काही काळापुर्वी कर्करोगामुळे निधन झाले आहे. त्यामुळे ते आपल्या मुलांचे पोषण शाळेतूनच करत आहेत. कुटुंबाला वाऱ्यावर न सोडता आपली मागणी लावून धरायची, अशी भारी कल्पना त्यांनी राबवली आहे.

Bhaskar Lokhande Nanded 1

अर्धापूर येथे एका माजी आमदाराने ३० वर्षांपुर्वी मुलींच्या शाळेची स्थापना केली. भास्कर लोखंडे हे २२ वर्षांपासून या शाळेत इंग्रजी विषय शिकवण्याचे काम करत आहेत. शाळा अनुदानित झाल्यानंतर पुर्ण वेतन मिळेल, या आशेवर ते ज्ञानदानाचे कार्य करत राहिले. खासगी क्लासेस घेऊन त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. त्यातच त्यांच्या पत्नीचे कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने निधन झाल्यामुळे ते आणखीच खचले.

लॉकडाऊननंतर सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. मुलांचा खर्च, घरखर्च भागवायचा कसा? असा प्रश्न लोखंडे यांच्यासमोर होता. नोकरी लागण्यापुर्वी शाळेने आपल्याकडून अनामत रक्कम घेतली होती. ही रक्कम आणि वेतन परत मिळावे, यासाठी लोखंडे यांनी ही शक्कल लढवली.