विनोद तावडेंच्या निषेधार्थ राज्यातील शिक्षकांची काळी दिवाळी

Mumbai
teachers celebrated black diwali in protest of vinod tawde
शिक्षकांनी प्रत्येक जिल्ह्यात साजरी केली काळी दिवाळी

राज्यातील शिक्षकांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याविरोधात आज काळी दिवाळी साजरी करून त्यांचा निषेध व्यक्त केला. शिक्षकांच्या काळ्या दिवाळीच्या धास्तीने शिक्षणमंत्र्यांची मात्र मोठी तारांबळ उडाली. अनेक शिक्षक काळ्या दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी तावडे यांना सकाळपासून शोधत होते. मात्र, दुपारपर्यंत ते भेटले नसल्याचा दावा अनेक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी केला आहे. तसेच आज राज्यभरात विविध जिल्ह्यात शिक्षकांनी काळ्या फिती बांधून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात आंदोलन केले.

शिक्षकांनी आपल्या शिक्षणमंत्र्यांना काळया दिवाळीची जाणीव करून देण्यासाठी सकाळी तावडे यांच्या सेवासदन या सरकारी बंगल्यावर आणि त्यानंतर विलेपार्ले येथील बंगल्यावर देखील मोर्चा नेला. मात्र, ते दुपारपर्यंत गायब असल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून करण्यात आला. मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये शिक्षकांनी तावडे यांच्या विरोधात रोष व्यक्त करत काळी दिवाळी साजरी केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुदानित, विनाअनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, संस्थाचालकांचा समावेश होता. कायम विनाअनुदानित कृती समिती, मुख्याध्यापक संघटनेच्या प्रतिनिधींनी सकाळी ८ वाजताच तावडे यांच्या सरकारी बंगल्याला घेराव घालून काळी दिवाळी साजरी केली.

राज्य सरकारने सप्टेंबर २०१६ पासून शाळांना २० टक्के अनुदान जाहीर केले. मात्र आता शंभर टक्के अनुदानाची आवश्यकता असतानाही अनुदान दिले जात नसल्याचा शिक्षकांचा आरोप आहे. अघोषित शाळा निधीसह घोषित करणे आणि अतिरीक्त शिक्षकांना सेवासंरक्षण मिळणे, अशा प्रकारच्या मागण्या शिक्षकांनी लावून धरल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here