शाळा सुरु होण्याआधीच शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

सोमवारपासून शाळा सुरु करण्याबाबत प्रश्नचिन्ह

Teachers corona positive before school reopened

मुंबई आणि ठाणे वगळता २३ नोव्हेंबरपासून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शाळा सुरु होणार आहेत. पण, शाळा सुरु होण्याआधी अनेक जिल्ह्यातील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शिक्षकांनाच कोरोनाची लागण झाल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय किती योग्य आहे, असा सवाल पालक आणि विद्यार्थी करत आहेत.

मुंबईसह ठाण्यातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, मुंबई, ठाणे वगळता काही जिल्ह्यातील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा २३ तारखेपासून उघडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य केल्याने सर्वांच्या कोविड आरटी-पीसीआर चाचणी केली जात आहे. यामध्ये अनेक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.

शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबादमध्ये शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ४८ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर नांदेडमध्ये एकाच शाळेतील अकरा शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय औरंगाबादमध्ये पंधरा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यात २५ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे येत्या सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने स्थगित करावा, अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने केली आहे.