घरमहाराष्ट्ररो-रो सेवेच्या तांत्रिक चुका

रो-रो सेवेच्या तांत्रिक चुका

Subscribe

करंजा मच्छीमार बंदर धोक्यात

रो-रो सेवेसाठी बनविण्यात येणार्‍या रस्त्याच्या कामामध्ये तांत्रिक चुका असल्याने 150 कोटीचे करंजा मच्छीमार बंदर धोक्यात आले आहे. रो-रो सेवेचा रस्ता तयार करताना गावात येणारे गटाराचे पाणी करंजा मच्छीमार बंदराच्या चॅनेलमध्ये जाणार असल्यामुळे मासळी दूषित होण्याचा धोका असल्याची तक्रार करंजा मच्छीमार सोसायटीसह स्थानिक मच्छीमारांनी केली आहे. भविष्यातील धोका ओळखून गावातून येणारे गटाराचे पाणी थेट समुद्राच्या मध्यात सोडावे, अशी मागणी सोसायटीने केली आहे. त्याबाबतचे पत्र मत्स्यव्यवसाय उद्योग, मेरीटाइम बोर्ड आणि संबधित अधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

करंजा-रेवस रो-रो सेवेसाठी करंजा येथे जेट्टीचे, तसेच इतर कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी 10 कोटी खर्च करण्यात आले आहेत. ब्रेक वॉटर बंधारा आणि जेट्टी, सर्व बोटींना पाण्यासह पेट्रोल-डिझेल भरण्याची सोय, स्वच्छतागृहे, प्रवाशांसाठी अत्याधुनिक निवारा शेड ही कामे पूर्ण झाली आहेत. आता रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र ठेकेदाराने कोणत्याही तांत्रिक बाबी न पाहता रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे पावसाळ्यात करंजाच्या नवापाडा येथे पुराचे पाणी तुंबण्याची शक्यता आहे. तसेच गावातील येणारे गटाराचे पाणी करंजा मच्छीमार बंदराच्या चॅनेलमध्ये जाऊन मासळी दूषित होण्याचा धोका आहे. करंजा मच्छीमार बंदर हे ससून डॉकच्या धर्तीवर बनविण्यात येणार असून, या बंदरात रायगड जिल्ह्यातील शेकडो मच्छीमार नौका मासळी उतरविण्यासाठी येणार आहेत.

- Advertisement -

या बंदरातच मासळीवर प्रक्रिया करून ती विविध देशात निर्यात केली जाणार आहे. बंदरात थांबलेल्या मच्छीमार नौका आपल्या बोटीतील मासळी धुण्यासाठी समुद्रातील पाण्याचाच वापर करतात. मात्र चॅनेलमधल्या दूषित पाण्याने मासळी धुतल्यास ती दूषित होण्याचा धोका असल्याची भीती सोसायटीचे चेअरमन भालचंद्र नाखवा यांनी व्यक्त केली आहे. एकदा मासळी दूषित असल्याचे परदेशात आढळून आले तर आपल्या मासळीला बंदी घातली जाईल आणि पर्यायाने मच्छिमारांप्रमाणे शासनाचेही मोठे नुकसान होणार असल्याकडे नाखवा यांनी लक्ष वेधले आहे.

मच्छीमार आणि ग्रामस्थांच्या याबाबतच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांच्या मागणीप्रमाणे गटाराचे पाणी हे रो-रो सेवेच्या शेवटच्या टोकाला नेऊन सोडले जाणार आहे. त्यासाठी वेगळे गटार तयार केले जाणार आहे.
-सुधीर देवरे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, महाराष्ट्र सागरी मंडळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -