घरमहाराष्ट्रराज्यातील करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारवर अस्थिरतेचे सावट

राज्यातील करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारवर अस्थिरतेचे सावट

Subscribe

मुंबई- देशातील करोनाचे संकट अक्राळ विक्राळ रुप धारण करत आहे. करोनाने मृत्यू पडलेल्यांपैकी सर्वाधिक संख्या राज्यात असतानाच त्याबाबत उपाययोजना करायला अपयशी ठरलेले महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाल्याचे पहायला मिळत आहे. सोमवारी शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. त्यानंतर रात्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आणि संजय राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर मंगळवारी राहुल गांधी यांनी ही राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार काँग्रेसला नाहीत, अशी खंत व्यक्त केली. राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या नाराजी नंतर ठाकरे सरकार अस्थिर झाल्याचेच संकेत मिळत आहेत.

मुख्यमंत्री म्हणून सहा महिने पूर्ण व्हायला अद्याप दोन दिवस शिल्लक असतानाच महाविकास आघाडीचे सरकार मोठ्या प्रमाणात अस्थिर झाल्याचे चित्र आहे. प्रामुख्याने रुग्णालयातील व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, विमान, रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी झालेला केंद्र आणि राज्यातील सरकारांचा घोळ आणि सुरक्षा व्यवस्था याबाबत ठाकरे अपयशी ठरल्याचे दिसत आहे. याबाबत एकटे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जबाबदार नसून तीन पक्षांत ताळमेळ नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. राहुल गांधी यांनी सरकारमध्ये काँग्रेसला विशेष महत्व नसल्याचे सांगून जनक्षोभात एकट्या ठाकरे यांच्याकडे लोटून त्यातून स्वत:च्या पक्षाला नामानिराळा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज्यातील सत्तेचे आणि सरकारचे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला असताना तीन पर्याय दिसून येत आहेत.

- Advertisement -

नव्या सत्तेसाठी पर्याय

पर्याय- १
महाविकास आघाडीमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला पाठिंबा देऊन राज्यातील सत्तेत सहभागी होतानाच केंद्रातही मंत्रीपद मिळविण्यासाठीची रणनिती शरद पवारांकडून अवलंबिली जाऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस जर भाजपसोबत गेली तर त्यांना केंद्रात दोन मंत्रिपदे हवी आहेत, ती मिळू शकतात. तसेच या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्रालयाशी संबंधित तपास यंत्रणांकडून पवार कॅम्पमधील काही सदस्यांना अभय मिळवता येईल. काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या हितचिंतकांच्या चार साखर कारखान्यांसाठी फायदेशीर ठरणार्‍या निर्णयांच्या फाईलींवर सह्या करण्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी नकार दिल्याने पवार संतापले आहेत. मात्र, राष्ट्रवादी या पर्यायासाठी गृहमंत्री अमित शहा फारसे अनुकूल नाहीत.

पर्याय-२
राष्ट्रवादी आपल्याला सोडून जाऊन भाजपला मिळण्याआधी आपला नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपला शिवसेना जाऊन मिळण्याचा दुसरा पर्याय समोर दिसतोय. यात राज्यातील सत्तेत वाटा, केंद्रात दोन कॅबिनेट खाती आणि मुंबई महानगरपालिकेचे पुन्हा एकदा आंदण असा हा प्रस्ताव आहे. यात अमित शहांच्या मार्गदर्शनाने काम करणारा भाजपचा वजनदार खासदार, ’मातोश्री’चे हितचिंतक, यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांनी हट्टाला पेटून मिळवलेल्या मुख्यमंत्री पदाला त्यांना हवा तसा न्याय मिळवून देता आलेला नाही.

- Advertisement -

पर्याय-३
राज्यातील करोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठाकरे सरकार पाडून भाजपचे सरकार बनवण्यापेक्षा राष्ट्रपती राजवट लागू करुन केंद्राला अभिप्रेत निर्णय घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक असलेल्या मुंबईला सर्वार्थाने सुरळीत करण्याचे प्रयत्न करता येतील. यासाठी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या नंतर नारायण राणे यांना योजनाबद्धरित्या मैदानात उतरवण्यात आले आहे. गेले अनेक महिने नव्या पक्षाच्या स्वभावाप्रमाणे शांत राहिलेले नारायण राणे राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्यानंतर राज्य भाजपने त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवलं आहे. हा शहा- राणेंच्या रणनितीचाच भाग असल्याचे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी सांगितले आहे.

अमित शहांनी टाकलेले फासे यशस्वी ठरले तर नारायण राणे यांचे केंद्रात राजकीय पुनर्वसन होऊ शकणार आहे. त्याचवेळी करोनामुळे चीनमधून बाहेर गेलेले मोठे उद्योगधंदे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात आणण्यासाठीचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात असल्याचेही दिल्लीतील नेत्याने अधोरेखित केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -