घरठाणेसेल्फीचे वेड बेतले जीवावर!

सेल्फीचे वेड बेतले जीवावर!

Subscribe

ठाण्यातील दाम्पत्याचा हेदवी किनारी बुडून मृत्यू; सेल्फी घेताना तोल गेला

गुहागरमधील निसर्गरम्य अशा हेदवी-बामणघळ येथे आई व मामेभाऊ यांच्यासमवेत पर्यटनासाठी गेलेल्या ठाण्यातील दाम्पत्याचा शनिवारी बुडून मृत्यू झाला. समुद्रकिनारी सेल्फी काढत असतानाच तोल जाऊन खाली पडल्याने हे दाम्पत्य बुडाले. स्थानिक पोलीस पाटील आणि तरुणांनी दोघांनाही काही वेळात बाहेर काढले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

थर्टी फर्स्ट आणि नववर्ष यामुळे कोकणातील समुद्रकिनारे गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांनी फुलले आहेत. ठाण्यातील अनंत माणगावकर (३६) आणि सुचेना माणगावकर (३३) हे दाम्पत्यही नातेवाईकांसह पर्यटनासाठी हेदवी येथे आले होते. शनिवारी समुद्रकिनारी भटकंती करत असताना या दोघांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही आणि हा सेल्फीच त्यांच्यासाठी काळ ठरला. हेदवीचा किनारा खडकाळ आहे. याच भागात सेल्फी काढत असताना सुचेना यांचा तोल गेला.

- Advertisement -

त्यांना वाचवण्यासाठी अनंत यांनी प्रयत्न केला आणि दोघेही खोल घळीत कोसळले. त्यानंतर स्थानिक यंत्रणांना लगेचच कळवण्यात आले. मात्र, हे दोघे वाचू शकले नाहीत. घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील, स्थानिक तरुण तसेच गुहागर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले व पुढील कार्यवाही करण्यात आली.
समुद्रकिनारी वसलेल्या हेदवी येथे खडकांतून उसळणार्‍या लाटा अनुभवण्यासाठी पर्यटक येत असतात. थर्टी फर्स्ट व नवीन वर्ष यामुळे गेले काही दिवस येथे पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. त्यात आज घडलेल्या या दुर्घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. किनार्‍यांवर अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्याची गरजही या निमित्ताने निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -