दहावी, बारावीची परीक्षा मे मध्ये होणार

दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चऐवजी मे महिन्यामध्ये होण्याची शक्यता असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

HSC mark sheet will not mention failed remark as eligible for ekill development courses

राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा कशी होणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी चिंतेत पडले आहे. परंतु आता दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चऐवजी मे महिन्यामध्ये होण्याची शक्यता असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

कोरोनामुळे यंदा शैक्षणिक वर्ष ऑनलाईन सुरू झाले. राज्यातील कोरोना रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ग सुरू होण्यास विलंब झाल्याने त्याचा परिणाम परीक्षेवरही होणार आहे. त्यामुळे दरवर्षी दहावी, बारावीची फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारी परीक्षा उशीरा घेण्यात येण्याची शक्यता आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व शिक्षण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. पण ही परीक्षा कोणत्या महिन्यात घ्यायचा याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. परीक्षा घेण्यासंदर्भोत राज्य मंडळ, शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण अधिकारी यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. तसेच यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञांची मतेही जाणून घेत आहेत. राज्याची भौगोलिक परिस्थिती पाहता परीक्षा मे महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्‍यांकडून देण्यात आली.

राज्यातील सर्व जिल्ह्यातील परीक्षा एकाच वेळी घेणे ही महत्त्वाचे आहे. विदर्भातील कडक ऊन, कोकणातील जोरदार पाऊस व इतर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊनच मे महिन्याच्या सुरुवातीला परीक्षा होऊ शकतात. कोरोनामुळे शिक्षण थांबले नाही, तर या आजाराने नैतिक जबाबदारी, सामुहिक जबाबदारी, स्वच्छता, आरोग्य या गोष्टींची प्रकर्षांने समाजाला ओळख करून दिली आहे, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.