कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सव

ढगाळ वातावरण आणि कमी झालेली तीव्रता या वातावरणातही काल अंबाबाईच्या मंदिरात संपूर्ण किरणोत्सव पार पडला.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात काल रविवारी किरणोत्सव पार पडला. या किरणोत्सवात अंबाबाईला सूर्यकिरणांचा जणू अभिषेकच झाला. सायंकाळी ५.४९ मिनीटे या कालावधीत सूर्यकिरणांनी देवीच्या मुखासह किरिटाला स्पर्श केला. दरम्यान ढगाळ वातावरण आणि कमी झालेली तीव्रता या वातावरणातही काल अंबाबाईच्या मंदिरात संपूर्ण किरणोत्सव पार पडला.

शनिवारी किरणोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी देवीच्या कमरेपर्यंत किरणं पोहोचली होती. पहिल्याच दिवशी ढगाळ वातावरण असल्याने किरणोत्सव होणार की नाही, याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता होती. रविवारी संपूर्ण किरणोत्सव पाहता येईल या भावनेने भाविकांनी रविवारी सायंकाळी मंदिरात मोठी गर्दी केली होती. सर्व भाविकांना किरणोत्सवाचा लाभ घेता यावा यासाठी मंदिराच्या आवारात एलईडी स्क्रीन उभारण्यात आले होते. दरम्यान किरणोत्सव पार पडताच उपस्थित भाविकांनी ‘अंबामाता की जय’चा जयघोष सुरु केला.

असा पार पडला किरणोत्सव

सायंकाळी ५ वाजून ९ मिनिटांनी सूर्यकिरणांनी गरुड मंडपातून मंदिरात प्रवेश केला. मंदिरात प्रवेश केलेली किरणं पाहून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं. जसजशी किरणं पुढं सरकू लागली तसतशी भाविकांमधील उत्सुकतासुद्धा वाढू लागली होती. त्यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ५ वाजून १३ मिनिटांनी सूर्यकिरणांनी गरुड मंडपाचा चौथरा पार केला. त्यानंतर ५ वाजून २७ मिनिटांनी सूर्यकिरणांनी गणपती मंदिरात प्रवेश केला. दरम्यान धुलिकण आणि हवेतील आर्द्रता यामुळे काही काळ किरणांची प्रखरता कमी झाली. यामुळे यावेळीही किरणं पोहोचतात की नाही, यामुळे भाविकांची धाकधूक वाढली. तीव्रता कमी होताच किरणं वेगानं पुढं सरकली. त्यानंतर ५ वाजून ४१ मिनिटांनी सूर्यकिरणांनी गर्भगृहात प्रवेश केला. यावेळी देवीचा पदस्पर्श करत थोड्या वेळातच किरणं देवीच्या कमरेपर्यंत गेली. त्यानंतर किरणं देवीच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचली. ५ वाजून ४९ मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीच्या चेहऱ्यासह किरिटाला स्पर्श केला. त्यानंतर काही क्षणातच सूर्यकिरणं डाव्या बाजूला लुप्त झाली.