कला उत्सवात मिळणार विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, शास्त्रीय संगीत, पारंपारिक लोकसंगीत, शास्त्रीय नृत्य, पारंपरिक लोकनृत्य, द्वीमितीय चित्र, त्रिमितीय चित्र/शिल्प व खेळणी तयार करणे या नऊ कला प्रकारांचा समावेश आहे.

kala

माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत कला उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, शास्त्रीय संगीत, पारंपारिक लोकसंगीत, शास्त्रीय नृत्य, पारंपरिक लोकनृत्य, द्वीमितीय चित्र, त्रिमितीय चित्र/शिल्प व खेळणी तयार करणे या नऊ कला प्रकारांचा समावेश आहे. राज्याच्या ९ कला प्रकारांचे ९ संघ राष्ट्रीय पातळीवर होणार्‍या ऑनलाइन कला उत्सवासाठी १० डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व शाळांमधील नववी ते बारावीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत. या कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक सहभाग असणार आहे. या स्पर्धेबाबतच्या मार्गदर्शक सूचना http://www.kalautsav.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जिल्हास्तरावरून निवडण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट संघामधून राज्याच्या संघ निवडीसाठी प्राप्त नामनिर्देशने व व्हिडिओ यांची तपासणी राज्यस्तरीय तज्ञ समितीमार्फत करण्यात येईल. राज्यस्तरीय सादरीकरणातून प्रत्येक कलाप्रकारासाठी १ विद्यार्थी व १ विद्यार्थिनी अशा ९ कलाप्रकारामध्ये १८ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करून राष्ट्रीय स्तरावर त्यांची नामनिर्देशाने पाठविण्यात येतील. राज्यस्तरावरून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना पुन्हा राज्यस्तरावर ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष सादरीकरण करावे लागणार आहे. याबाबतची माहिती स्वतंत्रपणे कळविली जाईल. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा या ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना याबाबतही स्वतंत्रपणे कळविले जाईल. असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.