घरमहाराष्ट्रमांजराने दूध पिण्यावरून मारहाणीत वर्षाची कैद

मांजराने दूध पिण्यावरून मारहाणीत वर्षाची कैद

Subscribe

मांजराने दूध पिण्यावरून दोन शेजार्‍यांमध्ये महिनाभरापूर्वी झालेला वाद अगोदर पोलीस ठाण्यात आणि त्यानंतर न्यायालयात पोहोचला आणि शिवीगाळ करून मारहाण करणार्‍या शेजार्‍याला खालापूर न्यायालयाकडून बुधवारी एक वर्ष कैद आणि दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. खोपोलीच्या वासरंग भागात राहणार्‍या अमीन इमाम नदाफ (32) याला ही शिक्षा झाली आहे.

अमीन नदाफ याच्या शेजारी राहणार्‍या मेहबूब चाँदसाहेब नदाफ याच्या घरातील दूध अमीनचे मांजर प्यायले. मेहबूब याच्या पत्नीने अमीनच्या घरी तक्रार केली असता त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा प्रकार ऐकून मेहबूब बाहेर आला आणि त्याने जाब विचारला असता अमीनने त्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. तसेच दगडाने मेहबूब आणि त्याच्या कुटुंबाला जखमी केले. मेहबूबने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अमीन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे अंमलदार संदीप नरूटे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

- Advertisement -

खटल्यात सरकारी वकील एस. वाय. नाईक यांनी सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून युक्तिवाद केला. मेहबूब यांची पत्नी आणि जखमी साक्षीदार यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. ठाकूर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर खालापूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाल धोंडगे यांनी महत्त्वपूर्ण निकाल देताना अमीन नदाफला एक वर्ष साधी कैद आणि दहा हजार रुपये दंड ठोठावला. यातील पाच हजारांची रक्कम मेहबूब नदाफ यांना मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -