हापूसच्या चाहत्यांनो ! यंदा हंगाम लांबणार

हवामान बदलाचा होणार परिणाम

हापूस आंबा

हवामान बदलले की त्याचा पहिला फटका हा पिकांना बसतो. यावर्षी कोकणातदेखील हवामान बदलाचा फटका हा हापूस, रायवळ आंबा आणि काजूला बसत आहे. दरवर्षी डिसेंबर अखेरीस मोहोर येऊन जानेवारीमध्ये फळे झाडाला लागलेली दिसायची. पण यंदा मात्र जानेवारी महिना अर्धा संपला तरी झाडावर फळे दिसत नाहीत.परिणामी यंदाच्या मोसमात हापूसची चव चाखायला आतूर असलेल्या खवय्यांना हापूसची दरवर्षीपेक्षा निदान महिनाभर जास्त वाट पाहावी लागणार आहे.

वातावरणात अचानक वाढणारा गारठा तर कधी अचानकपणे तापमानात उष्णता वाढत असल्याने त्याचा परिणाम हा आंबा आणि काजूच्या पिकावर होत आहे. त्यामुळे यंदा रत्नागिरी हापूस उशिराने बाजारात दाखल होण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच काजू उत्पादनावरदेखील हवामान बदलाचा परिणाम होणार आहे. शिवाय या सार्‍याचा परिणाम हा आंब्याच्या दरांवरदेखील होणार आहे.

आंबा-काजूवर परिणाम

हापूस आणि रायवळ आंब्याला आता कुठे मोहोर यायला सुरुवात झाली आहे. काही प्रमाणात का असेना पण हापूस आणि रायवळ आंबा लवकर मिळेल अशी आशा करता येत नाही. हवामान बदलामुळे काजू पिकालादेखील फटका बसत आहे. त्यामुळे काजू बागायतदार आणि छोटे शेतकरी हतबल झाले असल्याचे चित्र आहे.

खिशालाही कात्री ?

हापूसचे दर हे दरवर्षी चढेच असतात. पण यंदा मात्र त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. वातावरणात दिवसागणिक बदल होत असल्याने बागायतदार आणि शेतकरी औषध फवारणीवर जास्त लक्ष केंद्रीत करत आहेत. किमान आलेला मोहोर तरी नीट टिकावा याकरता प्रयत्न केला जात आहे. हापूस उशिरा बाजारात दाखल होणार असल्याने ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागतील, अशी प्रतिक्रिया आंबा बागायतदार देत आहेत.

या वर्षी आता कुठे मोहर यायला सुरूवात झाली आहे.तसेच दरवर्षीपेक्षा किमान 1 महिना तरी हंगाम लांबेल अशी शक्यता आहे.काजूच्या तुलनेत आंब्याला वातावरणाचा जास्त फटका बसला आहे. तसेच आंब्याचे दर हे त्यावेळच्या बाजारातील परिस्थितीवर अवलंबून असतील. – विद्याधर ठाकूर,आंबा बागायतदार,देवगड