घरमहाराष्ट्रवादग्रस्त करोना बॉडी बॅग राज्य सरकार खरेदी करणार

वादग्रस्त करोना बॉडी बॅग राज्य सरकार खरेदी करणार

Subscribe

- आरोपांनंतर महापालिकेने काढून घेतले अंग

मुंबई महापालिकेने कोविडमुळे मृत्यू होणार्‍या व्यक्तींच्या मृतदेहासाठी खरेदी केलेल्या ‘बॉडी बॅग’बाबत राजकीय पक्षांनी केलेल्या आरोपांनंतर आता या बॅगांच्या खरेदीतून महापालिकेने अंग काढून घेतले आहे. यापुढे या बॅगांची खरेदी राज्याच्या आरोग्य विभागामार्फत केली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या संचालकांच्या माध्यमातून ही खरेदी होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व कोविडमधील तज्ज्ञ डॉक्टर्सची कमिटी आता या बॉडी बॅगच्या खरेदीचा निर्णय घेऊन महापालिकेला पुरवठा करणार आहेत.

‘कोविड करोना-१९’ ने बाधित झालेल्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार सदर मृतदेह ‘बॉडी बॅग’मध्ये ठेऊन अंत्यसंस्कारासाठी दिला जातो. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसाठी करण्यात आलेल्या या बॉडीबॅग्जची खरेदी ६ हजार ७०० रुपयांना केली आहे. त्यामुळे अवघ्या २००० ते २२०० रुपयांमध्ये मिळणारी बॅग महापालिकेने ६ हजार ७०० रुपयांना घेतली. त्यामुळे सर्वप्रथम अंजली दमानिया आणि त्यानंतर महापालिकेतील भाजपच्या नेत्यांनी या बॉडी बॅग्जच्या खरेदीबाबत भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

- Advertisement -

वेदांत इन्फोटेक कंपनीकडून यापूर्वी २ हजार २०० बॉडी बॅग्जची खरेदी प्रति नग ६ हजार ७०० रुपयांना केली. निवड करण्यात आलेल्या उत्पादनाची केंद्र शासनाच्या संकतेस्थळावर या बॉडी बॅग्जची खरेदी प्रति नग ७ हजार ८०० रुपये एवढी होती. परंतु महापालिकेला या उत्पादन कंपनीने प्रति बॅग रुपये ६ हजार ७०० या दरात उपलब्ध करून दिली होती.

मात्र, या बॉडी बॅग्जबाबत भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर, महापालिकेने यातून अंग काढून घेतले असून शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातूनच या बॅग्जची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाचे संचालकांच्या माध्यमातून बॉडी बॅग्जची खरेदी केली जाणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर्स आदींच्या समितीमार्फत या बॅगची खरेदी करून यापुढे महापालिकेला पुरवठा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

यासंदर्भात आरोप झाल्यानंतर महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिले होते. परंतु या प्रकरणात थेट राज्य सरकारनेच हस्तक्षेप करत महापालिकेला आपल्या माध्यमातूनच याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने आता निविदा मागवून नव्याने खरेदी केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -