घरताज्या घडामोडीलाचखोर लिपिकास रंगेहाथ पकडले

लाचखोर लिपिकास रंगेहाथ पकडले

Subscribe
दोन महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे लोक घरात बसून आहेत, अशा स्थितीत शासकीय अधिकारी नागरिकांची पिळवणूक करण्याची कोणतीही संधी सोडत नसल्याचे समोर आले आहे. शेतजमीन रस्त्याच्या नकाशाच्या प्रती देण्यासाठी पाचशे रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या भुमिअभिलेखच्या लिपिकास लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे भुमिअभिलेख कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अरिफ जैनुद्दीन शेख (वय ३५, सोनारगल्ली, राहुरी) असे या लाचखोर लिपिकाचे नाव आहे. या लाचखोर लिपिकाला पकडण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात लाचलुचपतच्या नगर टीमने दुपारी सापळा लावला होता. कार्यालयातच तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचखोर लिपीक रंगेहाथ पकडला गेल्याने मंगळवारी भूमी अभिलेख कार्यालयात सन्नाटा पसरला होता. राहुरी खुर्द व राहुरी बुद्रुक येथील शेत जमिनीच्या रस्त्याचे नकाशे न्यायालयीन कामासाठी तक्रारदाराला हवे होते. भूमिअभिलेखचा लिपिक आरिफ शेख याने या नकाशाच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे पाचशे रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने यासंदर्भात नगरच्या लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार केली.
नाशिक विभागाचे पोलीस अधिक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक दिपक करांडे, सहाय्यक अधिकारी श्याम पवरे यांनी हा सापळा यशस्वी केला. भूमी अभिलेख कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात सापडल्याने या विभागाचा सावळागोंधळ देखील समोर आला आहे. विशेष म्हणजे पोलीस ठाणे व तहसील कार्यालय भुमिअभिलेख कार्यालयापासून काही अंतरावरच आहे. या दोन प्रमुख कार्यालयाजवळ हा सापळा यशस्वी झाल्याने भुमिअभिलेख सोबतच महसूल आणि पोलिस खात्यात देखील यामुळे खळबळ उडाली होती.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -