घरमहाराष्ट्रअतिरिक्त अभ्यासाने हरवले मामाचे गाव

अतिरिक्त अभ्यासाने हरवले मामाचे गाव

Subscribe

दहावीचा बागुलबुवा दाखवून अधिकाधिक वेळ अभ्यास करण्यास प्रवृत्त केले जाते.

एप्रिल आणि मे महिना म्हणजे सुट्टी, शाळेला बुट्टी, याकाळात फक्त खेळायचे, हुंदडायचे, मामाच्या गावी जायचे, बहिण-भावंडांसोबत मजेत रहायचे. जून उजाडेपर्यंत अभ्यासाचे नावसुद्धा काढायचे नाही. काही वर्षांपूर्वीचे हे चित्र आता मात्र बदलले आहे. वार्षिक परीक्षेनंतर मुलांना मिळणाऱ्या या हक्काच्या सवडीला गेल्या दोन दशकांपासून ग्रहण लागले आहे. गुणवत्तेच्या स्पर्धेत आपला पाल्य मागे पडू नये म्हणून पालक त्यांना कोणत्या ना कोणत्या कोचिंग क्लासमध्ये टाकतात. आता मुले आठवीत गेली की त्यांना दहावीचा बागुलबुवा दाखवून अधिकाधिक वेळ अभ्यास करण्यास प्रवृत्त केले जाते.

मुलांची ‘शाळा’ सुरूच

अनेक खाजगी शिकवणी वर्गात ‘आठवी ते दहावी’चे पॅकेजच ठरवलेले असते. तीच तऱ्हा बारावीची. अकरावीपासूनच मुले बारावीची तयारी करतात. पूर्व प्राथमिक अथवा प्राथमिक इयत्तेत असणाऱ्या मुलांनाही सुट्टीत मोकळे सोडले जात नाही. त्यांना एकतर वेगवेगळ्या छंद वर्गात टाकले जाते. अथवा व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांत अडकवले जाते. मुले घरात बसून फक्त मोबाइल, संगणक अथवा टीव्ही पाहत बसतात. त्यापेक्षा त्यांना अशाप्रकारे अडकविणे पालकांना सोयीचे वाटते. त्यामुळे वार्षिक परीक्षा संपली तरी निरनिराळ्या स्वरूपात मुलांची ‘शाळा’ सुरूच असते.

- Advertisement -

मे महिन्याची सुट्टी कालबाह्य

आता पूर्वीसारखी मुले महिना-दीड महिना गावाला जात नाहीत. गेलीच तरी आठ-दहा दिवसात परत येतात. कारण शाळेला सुट्टी असली तरी त्यांचा खाजगी शिकवणी वर्ग सुरू असतो. दहावी-बारावीला असणाºया विद्यााथ्र्यांचा शिकवणी वर्गात शाळा सुरू होण्यापूर्वीच अर्धाअधिक अभ्यासक्रम शिकवून झालेला असतो. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या मुलांचा अभ्यास बुडतो. त्यामुळे दहावी-बारावीला असणारी मुले शक्यतो सुट्टीत कुठेही बाहेरगावी जात नाहीत. त्यातून मग आता एप्रिल आणि मे महिन्याची सुट्टी कालबाह्य झाली आहे का, ? मुलांना दोन महिन्याच्या सुट्टीची आवश्यकता आहे का ? दोन इयत्तांमध्ये मुलांना ब्रेक हवाच असेल तर तो नेमका किती दिवसांचा असावा, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. स्पर्धेत आपला पाल्य कुठेही मागे पडू नये म्हणून पालक मुलांना महागडे शुल्क भरून निरनिराळी शिबिरे आणि कार्यशाळांमध्ये पाठवितात. मात्र त्यातून खरोखरच मुलांच्या ज्ञानात भर पडते का, त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो का असा प्रश्न उपस्थित होतो.

सुट्टीचा काळ पूरक अभ्यासासाठी देणे अनिर्वाय

काळानुरूप बदलायलाच हवे. गेल्या चार दशकात जग आमुलाग्र बदलले आहे. त्यामुळे आम्ही आमच्या लहानपणी दोन-अडीच महिन्यांची सुट्टी घेत होतो, तशीच सुट्टी आताच्या पिढीने घेणे व्यवहार्य ठरणार नाही. एनसीईआरटी, सीबीएसई बोर्डाच्या शिक्षण पद्धतीमुळे शिक्षण क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. त्याला तोंड द्याायचे असेल तर सुट्टीतला काही काळ पूरक अभ्यासासाठी देणे अनिर्वाय आहे. ती काळाची गरज आहे. – राजश्री महाडिक, पालक, कळवा.

- Advertisement -

सुट्टीच्या काळातील उपक्रम आवश्यक

सुट्टीच्या काळात शहरात अनेक संस्था खाजगीरित्या संस्कार शिबिरे, कौशल्य, व्यक्तिमत्त्व शिबिरे भरवितात. त्यासाठी महागडे शुल्क आकारतात. अशाप्रकारचे उपक्रम आवश्यक आहेतच, पण त्यासाठी शाळांनी पुढाकार घ्यायला हवा, असे मला वाटते. कारण शाळेकडे चांगले व्यवस्थापन आणि सुविधा असतात. सुट्टीच्या काळात तशीही शाळेची वास्तू मोकळीच असते. तिचा पूरक अभ्यासासाठी वापर करता येऊ शकेल. शिक्षण संस्था आणि पालकांच्या समन्वयातून अशा प्रकारचे उपक्रम राबविता येणे शक्य आहे. – सुरेंद्र दिघे, विश्वास्त, सरस्वती माध्यमिक शाळा, नौपाडा, ठाणे.

शिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया

मुळात संस्कार ही काही बाजारात विकत मिळणारी गोष्ट नाही. शिक्षण ही एक निरंतर घडणारी प्रक्रिया आहे. आता शिक्षण या क्षेत्रातील सेवा भाव कमी झाला असून व्यापारीकरण वाढू लागले आहे. तेव्हा कोणत्याही संस्कार वर्गांना अथवा कार्यशाळेत मुलांना टाकताना याचा कितपत फायदा होईल, याचा विचार पालकांनी करणे गरजेचे आहे. – विवेक पंडित, मुख्याध्यापक, विद्याा निकेतन शाळा, डोंबिवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -