घरमहाराष्ट्रनाराजांचे बंड उफाळले

नाराजांचे बंड उफाळले

Subscribe

थोपटेंच्या समर्थकांनी कार्यालय फोडले,भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत,प्रणिती शिंदे समर्थकांचे रक्ताने पत्र

ठाकरे सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार सोमवारी पार पडल्यानंतर जवळपास तिन्ही पक्षांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. मंत्रीमंडळात आपल्या नेत्याला स्थान न दिल्यामुळे मंगळवारी मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी थेट पुण्यातील काँग्रेस कार्यालयावर हल्ला करत कार्यालयाची मोडतोड केली. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांनाही मंत्रिमंडळापासून दूर ठेवल्याने त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना थेट रक्ताने पत्र लिहीत आपली नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे नाराज ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांची नाराजी शमविण्यात राष्ट्रवादीला यश आले असले तरी पक्षातील अनेक नेते अद्याप नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेकडून कोणीही नाराज नसल्याचा दावा दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला असला तरी सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी उघडपणे आपली नाराजी उघड केली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम देखील नेते पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

गेल्या महिन्याभरापासून रखडलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी मुंबईत पार पडला. या विस्तारात एकूण ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली असून यामध्ये तिन्ही पक्षातील अनेक इच्छुकांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या नेत्यांनी थेट मुंबईतून काढता पाय घेतला आहे. अनेकांचे फोन अद्याप नॉट रिचेबल आहेत. मंगळवारी या नाराजीचा फटका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना बसला आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे भोर विधानसभा मतदारसंघातील आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रीममंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे चिडलेल्या त्यांच्या समर्थकांनी पुण्यातील, शिवाजीनगरमधील काँग्रेसचे कार्यालय फोडून टाकले.भोर मतदारसंघातून थोपटे हे सलग तिसर्‍यांदा मंत्री झाले आहेत. संग्राम थोपटे हे पक्षाशी एकनिष्ठ राहूनही त्यांना मंत्रिपद का दिले नाही? असा सवाल उपस्थित करत कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. पुण्यातील सर्वात जुने असलेले काँग्रेसचे कार्यालयात कार्यकर्त्यांनी जोरदार तोडफोड केली. काँग्रेस नेते रमेश बागवे यांच्या दालनाची तोडफोड करण्यात आली. खुर्च्या, काचा आणि टेबलेही तोडून टाकण्यात आली.

मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भास्कर जाधव म्हणाले की, मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिले होते. काही गोष्टी आश्वासित केल्या होत्या, त्या सर्वांसमोर बोलायच्या नसतात असे सांगून मी त्यांची वेळ मागितलेली नाही. ते ज्यादिवशी वेळ देतील त्यावेळी मी त्यांचीशी बोलणार आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, न मिळाल्याने मला धक्का बसला आहे.

- Advertisement -

माझ्याबाबतची अजून कटूता संपलेली नाही, याला वाव राहतो, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली. पण मी नाराज नाही, माझे मंत्रिमंडळ विस्तारात नाव नसल्याने मला आश्चर्याचा धक्का बसला. शिवसेनेत सर्वात जास्त निवडून आलेला आमदार आहेत, प्रशासनाचा मला दीर्घकाळ अनुभव आहे, उत्कृष्ठ संसदपटू म्हणून मला पुरस्कार मिळाला आहे, सातत्याने निवडून येत आहे, संसदीय कार्यप्रणाली मला माहीत आहे. आदित्य ठाकरे यांना या अनुभवाचा फायदा देण्याचा माझा प्रयत्न होता. मी निश्चित होतो की, मंत्रिमंडळमध्ये असू, यासर्वांना एकाकी तडा गेला आहे, असे जाधव यांनी म्हटले आहे.

रक्ताचे पत्र
सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनाही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचेही समर्थक नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी पक्षश्रेष्ठींना रक्ताने पत्र लिहून व्यक्त केली आहे. सोलापूरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी हे पत्र लिहिले आहे. तसेच जिल्ह्यातील अनेकांनी सामूहिक राजीनामे देत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

कदमही नाराज
शिवसेनेकडून यंदा ज्येष्ठांना संधी नाकारल्याने अनेक ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यात रामदास कदम यांचाही समावेश आहे. कदम हे पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -