दिव्यांग मुलांवर ‘वारी’चे पहिलेच गीत

Mumbai
हरिनामाच्या गजरात विद्यार्थी तल्लीन

विठ्ठलाच्या वारीवर आजवर अनेक गाणी चित्रित झाली आहेत. परंतु दिव्यांग मुलांच्या भावना मांडणारे ‘देह दुबळा रे, आस कणखर ही, माझे मीपण, लागे रूताया’ हे गाणे प्रथमच परळमधील नरेपार्क दिव्यांग मुलांच्या पालिका शाळेत चित्रित करण्यात आले. यावेळी काढलेल्या दिंडीमध्ये विठ्ठलाच्या चरणी सर्वच समान असतात. तिथे कोणताही भेद नसतो. याचा अनुभव विद्यार्थ्यांनी अनुभवला. परळमध्ये प्रत्यक्षात अवतरलेली विठ्ठलाची वारी जशी विशेष होती, तसेच त्यामध्ये सहभागी झालेले वारकरीही ‘विशेष’ होते.

मुंबईतील दिव्यांग विद्यार्थ्यांना गणपतीची विसर्जन मिरवणूक माहित असते. पण त्यांना गणपतीप्रमाणे आपली संस्कृती असलेल्या पंढरपूर वारीची माहिती नाही. त्यामुळे त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, वारीची ओळख व्हावी, वारीमध्ये तल्लीन होऊन जाणे काय असते याचा अनुभव त्यांना घेता यावे. यासाठी श्रीरंग संस्थेतर्फे मराठी सिनेसृष्टीतील कलादिग्दर्शक सुमीत पाटील यांच्या संकल्पनेतून परळमधील नरेपार्क मतिमंद मुलांच्या पालिका शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘विशेष’ दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे, त्यांना टाळ-मृदुंगाच्या तालावर ठेका धरता यावा, फुगडी घालता यावी यासाठी महिनाभर प्रशिक्षण देण्यात आले होते. नरेपार्कमध्ये काढलेल्या दिंडीमध्ये विद्यार्थी विठ्ठलाच्या नामामध्ये तल्लीन झाले होते. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विठ्ठलाच्या प्रती भावना मांडणारे विशेष गाणे यावेळी चित्रित करणण्यात आले. ‘देह दुबळा रे, आस कणखर ही’ या ओळीतून दिव्यांगाच्या मनातील भावनांना वाट करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

दिंडीमुळे नरेपार्क शाळा व परिसरातील वातावरण विठ्ठलमय झाले. दिंडीत सहभागी ‘विशेष’ वारकर्‍यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत विठूचा गजर केला. दिंडीमध्ये फुगडी, नृत्य करत ते विठ्ठलाच्या नामामध्ये तल्लीन झाले. पारंपरिक वेशात आलेले ‘विशेष’ वारकर्‍यांनी माहीमच्या संस्कृती-रंग यांची पारंपरिक गाणी तसेच मंगळगौर सादर झाली. विठ्ठल-रखुमाई आणि वारकरी बनलेल्या वारकर्‍यांनी सामाजिक भान जपत नागरिकांना ‘पर्यावरण वाचवा’ आणि ‘अवयवदाना’चे महत्व पटवून देत सामाजिक संदेशही दिला. पारंपरिक वेशात नटलेल्या विशेष विद्यार्थ्यांनी सजवलेली विठ्ठलाची पालखी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. नरेपार्क शाळेतील वातावरण सकाळपासून विठुमय झाले होते. वडाळाच्या विठ्ठल मंदिरातील वारकरीही यावेळी उपस्थित होते.

विठ्ठल ‘स्पेशल’ दिंडीवर चित्रित केले गेलेले गीत अश्विनी शेंडे यांनी शब्दबद्ध केले. तर शिवहरी रानडे यांनी संगीत दिले आहे. पार्श्वगायक जयदीप बगवाडकर आणि व्हायोलनिस्ट श्रुती भावे यांनी सुरेल आवाजात हे गीत गायलेे. संदेश कदम यांनी हे गीत तालबद्ध केले. पराग सावंत यांनी हे गीत चित्रित केले असून अक्षय माने आणि अमित रुके यांनी या गाण्यासाठी दिंडीतील क्षण चित्रित केले आहेत. आरती कादवडकर, साक्षी खाडये आणि रोहन टिपे यांनी या गाण्यासाठी चित्रसहाय्य केले तर सौरभ नाईक यांनी संकलन केले आहे.

महाराष्ट्राला संताची मोठी परंपरा आहे. संत परंपरेत आषाढी वारीला सणाचे महत्त्व आहे. हा सण दिव्यांग विद्यार्थ्यांना अनुभवता यावा, यासाठी ही दिंडी काढली होती. यासाठी महिनाभरापासून विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली होती.
– सुमित पाटील, कलादिग्दर्शक