व्यावसायिक सापडले आर्थिक अडचणीत

खाद्याअभावी मुळा धरणातील मत्स्यपालन आले धोक्यात

Mumbai

करोनाची महामारी रोखण्यासाठी सर्वच स्तरावर पाऊले टाकली जात आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून देशभरात त्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचा फटका राहुरीच्या मुळा धरणातील बंदिस्त मासेपालन व्यावसायाला बसला आहे. विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथून मत्स्यखाद्य आता राहुरीत पोहचणार नाही. करोनाच्या धास्तीने हे खाद्य आणण्यासाठी वाहतुकदार धजावत नसल्याने धरणाच्या पाण्यात तयार झालेल्या माशांचे जीव धोक्यात आले आहे.

मुळा धरणात मत्स्यपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी ५३ बंदीस्त पिंजरे (केज) लावण्यात आले असून यात अर्धा किलोपासून ते दिड किलोपर्यतच्या वजनाचे मासे तयार झाले आहेत.

या माशांना आवश्यक असणारे ग्रोवेल, कारगील, सिटी कंपनीचे खाद्य विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथून येते. विजयवाडा ते राहुरी मुळा धरणापर्यतच्या अंतरासाठी २३०० रुपये टनाप्रमाणे वाहतुक खर्च आकारला जातो. धरणात तयार झालेल्या चिलापी, चोपडा, कोंबडा या माश्यांना दैनंदिन पंधरा टन खाद्याची आवश्यकता असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून देशभरात लॉकडाऊन लागु केले. त्यामुळे वाहनचालक, ट्रान्सपोर्ट मालक आपली वाहने रस्त्यावर आणण्यास धजावत नसल्याने याचा मोठा फटका आता मत्सव्यवसायाला बसणार आहे. करोनामुळे खाद्याची वाहतुक विस्कळीत झाली होती.

मंगळवारपर्यंत पुरेल एवढेच खाद्य धरणातील मत्सपालन करणार्‍यांकडे उपलब्ध होते. आता त्यांच्याकडील खाद्य संपल्याने बुधवारपासूनच खाद्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे माशांना खाद्य म्हणून बुधवारी पोह्यांचा वापर करण्यात आला. भविष्यात या माशांच्या वाढीसाठी पुरेसे खाद्य उपलब्ध झाले नाही तर त्यांची उपासमार होणार असून बंदीस्त पिंजर्‍यातील मत्सपालन धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पंतप्रधानांच्या लॉकडाऊनचा फटका पहिल्याच दिवशी धरणातील लाखो माशांना बसला आहे.

मुळा धरणातील पाण्यात बंदिस्त मत्स्यपालन (केज) हा व्यवसाय बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा ठरला आहे. शासनाक! या व्यवसायासाठी ६० टक्के सबसिडी दिली जात असली तरी अद्याप पुरेशी सबसिडी मिळाली नसल्याने या व्यवसायिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे ही अडचण उभी असतानाच दुसरीकडे मत्स्यखाद्य तुटवडा जाणवू लागल्याने व्यावसायिक सर्वबाजूने अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-शरद बाचकर, संस्थापक, बाचकर फिशरीज.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here