महड प्राथमिक शाळेचे भवितव्य अंधारात

एकाच शिक्षकामुळे पालक संतप्त

Mumbai
Mahad Primary School

तालुक्यातील महड प्राथमिक शाळेत सहा वर्षांपासून पहिली ते चौथीच्या वर्गावर एकच शिक्षक असल्यामुळे पाल्यांच्या भवितव्याबद्दल पालक चिंतित झाले आहेत. या प्रकारामुळे संतापलेल्या पालकांनी गट शिक्षण अधिकार्‍यांची भेट घेत आठवडाभरात दुसर्‍या शिक्षकाची नेमणूक करा अन्यथा पाल्यांचे दाखले द्या, अशी मागणी केली आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या या मराठी शाळेचे पहिली ते चौथीपर्यंत वर्ग भरतात. या ठिकाणी दोन शिक्षकांची नेमणूक आहे. सहा वर्षांपूर्वी याच शाळेतील शिक्षकाला विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आजतागायत दुसर्‍या शिक्षकाची या ठिकाणी कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आलेली नाही. चार वर्ग सांभाळण्याची कसरत सध्या तेथील शिक्षिकेला करावी लागत आहे. चारही वर्गांचे विद्यार्थी एकाच वर्गात बसवून शिकवावे लागत आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याची तक्रार पालक करीत आहेत.

तात्पुरती सह शिक्षिका नेमण्यात आली होती. तिचीसुद्धा बदली करण्यात आली आहे. त्यामुळे एक शिक्षकी शाळा सुरू आहे. कित्येक पालकांनी आपल्या मुलांची या शाळेतून नाव कमी करून त्यांना खोपोली येथील शाळेत प्रवेश घेतला आहे. याचा परिणाम पटसंख्येवर झाला आहे. पाच वर्षांपूर्वी 60 च्या घरात असलेला पट 30 च्या खाली आला आहे. गेेल्या सोमवारी जागरूक पालकांनी तालुका पंचायत समिती कार्यालय गाठत प्रभारी गट शिक्षण अधिकारी पोळ यांची भेट घेतली. आठवडाभरात दुसर्‍या शिक्षकाची नेमणूक करा अन्यथा आमच्या मुलांचे दाखले द्या, असा इशाराच दिल्याचे पालक ज्योती राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

मराठी शाळेकडे पालक पाठ फिरवत असताना आम्ही मुलाना गावात जवळची शाळा म्हणून पाठवतो. परंतु शिक्षकाअभावी मुलांचे भविष्य बरबाद होऊ नये, म्हणून आम्ही दुसर्‍या शाळेत प्रवेश घेण्याच्या तयारीत आहोत.
– संतप्त पालक

जून महिन्याच्या अखेरीस नवीन शैक्षणिक वर्षात अतिरिक्त शिक्षक कुठे आहेत याची माहिती मिळेल. त्याप्रमाणे महड शाळेसाठी दुसर्‍या शिक्षकाची नेमणूक आठवडाभरात होईल.
-भाऊसाहेब पोळ, प्रभारी गट शिक्षण अधिकारी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here