पुण्यात काँग्रेसची एकाकी लढाई

Mumbai
34 - Pune Lok Sabha Constituency
पुणे लोकसभा मतदारसंघ

पुणे लोकसभा मतदारसंघात पुढच्या चार दिवसांत अर्थात २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. यादरम्यान भाजपचे उमेदवार गिरीष बापट यांच्या प्रचारासाठी भाजप आणि मित्र पक्षांनी एकत्र येऊन प्रचाराला जोर दिला असला तरी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारासाठी मात्र केंद्र आणि राज्यातील नेत्यांच्या तारखा अद्याप मिळाल्या नाहीत, राष्ट्रवादीचे नेते मावळ आणि बारामतीत ठाण मांडून आहेत, त्यामुळे या ठिकाणी पुणे काँग्रेसची एकाकी लढाई सुरू आहे.

लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्यात, २३ एप्रिल रोजी देशभरात होणार्‍या मतदानामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. अवघ्या ३ दिवसांवर येऊन ठेपलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस पक्षाचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. असे असले तरी पुण्यातील प्रचारात भाजपच्या तुलनेत काँग्र्रेसने तितकीशी ‘आघाडी’ घेतलेली दिसत नाही. कारण आतापर्यंत भाजपचे केंद्र आणि राज्य पातळीवरील नेते गिरीष बापट यांच्या प्रचारासाठी पुण्यात येऊन गेले आणि अजून येत आहेत. भाजपचे मित्रपक्ष शिवसेना, रिपाइं यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रचारात जोमाने सहभागी झाले आहेत, परंतु त्या तुलनेत काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार मोहन जोशी यांच्यासाठी अजूनही पक्षश्रेष्ठींच्या तारखा मिळाल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असली तरी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक किंवा नेते पुण्याच्या वाट्याला मिळत नाहीत. या सर्व मंडळींनी मावळ आणि बारामती मतदारसंघात लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची तशी एकाकी लढाई या ठिकाणी सुरू आहे.

या मतदारसंघात भाजपने फार आधीच उमदेवार घोषित केला, त्यामुळे भाजपची लोकसभा निवडणुकीच्या दिशेने तयारी अगोदरपासून सुरू होती, या उलट काँग्रेसला या ठिकाणी उमेदवार निश्चित करायला बराच उशीर झाला. उमेदवार पुण्यातील स्थानिक द्यायचा की बाहेरचा, याच संभ्रमात काँग्रेस श्रेष्ठी अडकून राहिले. अखेरीस स्थानिक उमेदवार देण्यावर निश्चिती झाली, त्यानंतर उमेदवार कोणत्या जातीचा द्यायचा, यावर खल सुरू झाला. मराठा समाजाचा की ब्राह्मण? त्या दरम्यान संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. मात्र अखेर स्थानिक आणि निष्ठावंत तसेच गिरीष बापट यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून ब्राह्मण जातीचे माजी आमदार मोहन जोशी यांचे नाव निश्चित झाले. तोवर बराच काळ उलटून गेला होता. भाजपने तोपर्यंत प्रचारात गती घेतली होती. एकूणच या सर्व परिस्थितीतून काँग्रेसची वाटचाल खडतर आहे.

पुणे शहरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाल्याने काही प्रमाणात पुण्यात भाजपविरोधी वातावरण निर्मिती झाली आहे. पुण्यात येऊन राज ठाकरे यांनी त्यांच्या नव्या छाटणीचे भाषण करून पुणेकरांना विचार करण्यास भाग पाडले आहे. मात्र भाजपविरोधी वातावरणनिर्मिती आणखी ताणण्यासाठी पुणे काँग्रेससमोर आव्हान आहे. तसेच देशभर मोदींच्या विरोधात सुप्त लाट आहे. त्या लाटेवर सध्या पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस निर्भर आहे, असे वातावरण आहे.