पिस्तुलासह तरुणाला अटक

Mumbai
प्रातिनीधीक फोटो

तालुक्यातील भिलवले गावाच्या हद्दीत विनापरवाना पिस्तुल बाळगणार्‍या अनिल राजेश चव्हाण (21, रा.ठाणे रेल्वे स्टेशनजवळ) याला रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून शिताफीने अटक केली आहे. त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सर्वत्र नाकाबंदी व तपासणी मोहीम सुरू आहे. शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांना खबर्‍यामार्फत दोन तरुण भिलवले गावाच्या हद्दीत येणार आहेत. त्यांच्याजवळ पिस्तुल व जिवंत काडतूस असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय एस. व्ही. सस्ते, पोलीस नाईक सागर शेवते, सुभाष पाटील व संदीप चव्हाण शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास भिलवले येथे दबा धरून बसले होते. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांचे वर्णन खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार जुळत असल्याची खात्री त्यांना पटली. त्यानंतर पोलीस पथकाने दुचाकी अडवून चौकशी सुरू केली. त्यावेळी त्यातील एका तरुणाने अंधाराचा फायदा घेत जवळच्या झाडीतून पळ काढला.

पोलिसांनी दुसर्‍या तरुणाला ताब्यात घेत त्याच्याजवळील सॅकची झडती घेतली. त्यात आठ राऊंडचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस सापडले. आरोपीला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मिळाले आहेत.

भिलवले हद्दीत उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे फार्महाऊस आहेत. त्यामुळे पिस्तुल प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना पिस्तुलाचा नेम नक्की कोणावर, याचा उलगडा पोलीस चौकशीत होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here