घरमहाराष्ट्रसभा ४ तास उशिराने सुरु; अवघ्या काही मिनीटात कोट्यावधींचे प्रस्ताव मंजूर

सभा ४ तास उशिराने सुरु; अवघ्या काही मिनीटात कोट्यावधींचे प्रस्ताव मंजूर

Subscribe

केडीएमसी महापालिकेत स्थायी समितीची सभा बोलाविण्यात आली होती. मात्र तब्बल ४ तास उशिराने ही सभा सुरु झाली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटामध्ये कोट्यवधी रुपयांचे प्रस्तव मंजूर करण्यात आले.

महापालिकेला दुसरा शनिवार सुट्टीच्या दिवशी स्थायी समितीची सभा बोलाविण्यात आली होती. मात्र तब्बल ४ तासानंतर सभा सुरू झाल्याने पालिकेतील अतिरिक्त आयुक्तांसह सर्वच विभागातील अधिकारी आणि पत्रकारांना ताटकळत राहावे लागले. आयत्यावेळच्या प्रस्तावावर आयुक्तांची सही झाली नव्हती. त्यामुळे ही सही घेण्यासाठीच हा खोळंबा झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. अखेर स्थायी समितीने अवघ्या काही मिनीटात सुमारे ५ कोटयावधीचे प्रस्ताव मंजूर केले. आयत्यावेळचे प्रस्ताव सोमवारच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याचे निर्देश सभापती दिपेश म्हात्रे यांनी दिले.

एकाच कंत्राटदाराला दिली सर्व कामे

निवडणुकीच्या आचारसंहितेचा बागुलबुवा करीत स्थायी समितीने बैठकीचा धडाका लावला आहे. प्रत्येक बैठकीत कोटयावधी रूपयांची कामे मंजूर करून घेतली जात आहे. दुसरा शनिवार हा सुट्टीच्या दिवशी स्थायी समितीच्या सभेचे आयेाजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता सभा बोलावण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात दुपारी २ वाजून २० मिनीटांनी सभा सुरू झाली. तब्बल चार तास ताटकळत राहावे लागल्याने पालिकेतील सर्व अधिकारी आणि पत्रकार कंटाळले होते. सभेच्या पटलावर सुमारे साडेपाच कोटीचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यातील कल्याण बाहय वळण रस्त्याची झाडे तोडणे आणि झाडे लागवड करणे १ कोटी ६८ लाख १५ हजार ४१३, कल्याण प्रभाग २८ रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट ८९ लाख ३१ हजार ६३१ आणि कल्याण महापौर बंगल्याची दुरूस्ती ६६ लाख ५५ हजार २८३ हे सुमारे सव्वा तीन कोटीची कामे गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली आहेत. एकाच कंत्राटदाराला इतकी कामे का? असा सवाल नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी उपस्थित केला. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक यांनी गायत्री मंत्राचा जप असल्याचा वक्तव्य केले. छोटे नालेसफाईच्या कामांचे आयत्यावेळेचे एकूण १८ विषयी पटलावर ठेवण्यात आले होते. मात्र त्यातील तीन प्रस्तावांना मंजूरी देत पुढील विषय सेामवारच्या सभेत मंजुरी साठी ठेवण्यात आले.

- Advertisement -

पालिका आयुक्तांना ताप

छोटया नाल्यांच्या सफाईची कामे आणि शाळा दुरूस्ती या आयत्यावेळचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. मात्र आयत्यावेळच्या प्रस्तावावर पालिका आयुक्तांची सही आवश्यक होती. दुसरा शनिवार पालिकेला सुट्टी असल्याने पालिकेतील पदाधिकारी हे आयुक्तांची सही घेण्यासाठी बंगल्यावर गेले होते. आयुक्त गोविंद बोडके यांना ताप आल्याने ते आजारी आहेत. त्यामुळे आयुक्तांची सही घेण्यासाठी तब्बल चार तासांचा खोळंबा झाला. पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी उपायुक्त सुरेश पवार यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार सोपविला आहे. माध्यमातून आयुक्तांवर चांगलीच टीका झाली.

मोठया नाल्यांच्या सफाईच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र छोटया नाल्यांच्या सफाईची कामे, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, ट्रेंन्चेस भरणे, शाळांची दुरूस्ती ही कामे मुदतीत होणे गरजचे आहेत. आचारसंहितेमुळे नालेसफाईची कामे अडकून राहू नयेत त्यासाठी या कामांचे टेंडर पावसाळयापूर्वीच काढण्यात आली आहेत. खड्डा फीच्या माध्यमातून पालिकेला १६ कोटी रूपये जमा झाले आहेत, यंदाच्या वर्षी २० कोटी रूपये मिळणार आहेत. पालिका आयुक्त आजारी असल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. सभेला कमी सदस्य उपस्थित असल्याने कोरम पूर्ण नसल्याने सभा सुरू होण्यास विलंब झाला.
– दिपेश म्हात्रे, सभापती स्थायी समिती

आता स्वच्छतेवर अधिक भर देणार

केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात केडीएमसी ७७ स्थानावर आहे. मात्र त्याहून चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी स्वच्छतेवर भर देणार आहेात असे सभापती म्हात्रे यांनी सांगितले. शहरातील कचरा वेचकांमुळे बहुतांशी कचरा कमी होण्यास मदत होतो. त्यामुळे शहराच्या स्वचछतेसाठी त्यांचाही हातभार आहे. प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीतील कचरा वेचणा-यांची बैठक घेऊन शहरातील कचरा नाहीसा करण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू असल्याचे म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -