घरमहाराष्ट्ररोहे उपजिल्हा रुग्णालयाला वैद्यकीय अधीक्षकाची गरज

रोहे उपजिल्हा रुग्णालयाला वैद्यकीय अधीक्षकाची गरज

Subscribe

रविवारच्या दुर्घटनेनंतर रोहेकरांनी मांडल्या व्यथा , तरुणाईने स्वस्थ बसू नये -ज्येष्ठ नागरिकांची भावना

रविवार 24 मार्च रोजी नितीश भातखंडे याच्या अपघाती निधनानंतर रोह्यामध्ये सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे त्याचा बळी गेला असा निषेधाचा सूर सर्व रोहेकरांनी लावला असल्याचे दिसत आहे. या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी संतप्त झालेल्या रोह्यातील युवा शक्तीने बैठकीचे आयोजन केले होते. त्यानुसार मंगळवारी 26 मार्च रोजी रोह्यातील विठ्ठल मंदिरात बैठक झाली. गेली कित्येक वर्षे शासकीय आरोग्य सेवेसारख्या महत्वपूर्ण सेवेला रोहेकर मुकले आहेत. वेळेवर सेवा न मिळाल्यामुळे काहींना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे रोहेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने या बैठकीला हजेरी लावली होती.

यावेळी तरुणांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ती समिती यापुढे या विषयावर अभ्यास करुन ज्येष्ठांच्या सल्ल्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. रोहे उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक 1, वैद्यकीय अधिकारी 8 इतकी पदे आहेत. पण सहाच पदे भरली आहेत. यामधील 1 वैद्यकीय अधिकारी सुरुवातीला एकदिवस हजेरी लावल्यानंतर आजपर्यंत गैरहजर आहेत, तर दुसर्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांची प्रतिनियुक्ती अलिबाग येथे आहे. तिसरे वैद्यकीय अधिकारी हे उच्च शिक्षणासाठी ठाणे येथे आहेत. त्यामुळे रोहे उपजिल्हा रुग्णालय 50 खाटांचे असताना केवळ 3 डॉक्टर काम पाहत आहेत. त्यामध्ये सुद्धा वैद्यकीय अधिकार्‍यांचा दर्जा असणार्‍या डॉक्टर, वैद्यकीय अधीक्षक हे अतिरिक्तपदी काम पाहत आहेत. म्हणजे सद्य:स्थितीत रोहे येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण पदे 8 कागदावर भरलेली पदे 6 आणि रिक्तपदे 2 आहेत. तरी प्रत्यक्षात केवळ 3 वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. यामुळे प्रशासन फक्त कागदी घोडे दामटवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

विठ्ठल मंदिरात झालेल्या बैठकीत आजपर्यंत रोहा उपजिल्हा रुग्णालय हे कसे रोहेकरांना सेवा पुरविण्यात अपयशी ठरले आहे याचा पाढा प्रत्येकाने मांडला. या बैठकीमध्ये रोह्यामधील मरगळलेल्या शासकीय आरोग्य सेवेवर चर्चा झाली. यानंतर आगामी काळात राजकीय पक्ष विरहीत समाजभावनेने काम करणार्‍या रोह्यातील युवकांची एक समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमार्फत रोह्यामधील आरोग्य सेवा कशी सशक्त करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नागरीक व पत्रकार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन या नवयुवकांना असेल असे सहमतीने ठरविण्यात आले.

प्रशासनामार्फत रोह्यात वैद्यकीय अधिकारी नेमण्यात येत आहेत. मात्र विविध कारणांमुळे त्यांची पदे रिक्त राहत आहेत. यासोबतच जर रोहा शहर व परिसरातील एमबीबीएस झालेले डॉक्टर अर्धवेळ आणि पूर्णवेळ उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे सेवा देण्यास इच्छुक असतील तर त्यांनी माझ्या कार्यालयात अर्ज करावेत. यासाठी या नेमणूक झालेल्या डॉक्टरांना योग्य ते मानधन देण्यात येईल.
-डॉ. अजित गवळी जिल्हा शल्यचिकित्सक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -